दुसऱ्या धर्मातील पुरुषाशी लग्न करणाऱ्या दोन पारसी महिलांना दिलासा मिळाला आहे. या महिलांना अग्यारी तसेच पारसी समाजाच्या ‘टॉवर ऑफ सायलन्स’मध्ये प्रवेश देण्याचा निर्णय वलसाडमधील पारसी पंचायतने घेतला आहे.

गुलरोख एम गुप्ता या महिलेने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. गुलरोख या पारसी असून त्यांनी एका हिंदू तरुणाशी लग्न केले होते. दुसऱ्या धर्मातील तरुणाशी लग्न केले म्हणून गुलरोख यांना त्यांच्या वडिलांच्या अंत्यसंस्कारास उपस्थित राहता आले नव्हते. याविरोधात त्यांनी हायकोर्टातही याचिका दाखल केली. हायकोर्टाने ट्रस्टच्या बाजूने निकाल दिल्याने त्या सुप्रीम कोर्टात पोहोचल्या. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. ए के सिकरी, ए. एम. खानविलकर, डी वाय चंद्रचूड आणि अशोक भूषण यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणावर गेल्या आठवड्यात सुनावणी झाली होती. लग्नानंतर महिलेचा धर्म बदलत नाही, असे स्पष्ट करतानाच वलसाडमधील झोरास्ट्रियन ट्रस्टने त्यांच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, असे कोर्टाने सांगितले होते. पारसी समाजाच्या बाहेरील व्यक्तींना प्रवेश देऊ नये, असा कोणताही कायदा नसल्याचे कोर्टाने म्हटले होते. तसेच दोन वेगवेगळ्या धर्मातील व्यक्ती एकमेकांशी लग्न करु शकतात आणि लग्नानंतरही ते त्यांच्या धर्माचे अनुकरण करु शकतात. त्यामुळे महिलांना पतीचा धर्म स्वीकारण्याची सक्ती करता येणार नाही. तो निर्णय महिलेवरच अवलंबून असेल, असेही कोर्टाने स्पष्ट केले होते.

गुरुवारी सुप्रीम कोर्टात या प्रकरणावर सुनावणी झाली. वलसाडच्या झोरॅस्ट्रीयन ट्रस्टने गुरुवारी सुप्रीम कोर्टात महत्त्वपूर्ण माहिती दिली. दोन्ही महिलांना ‘टॉवर ऑफ सायलन्स’मध्ये प्रवेश देण्यास तयार असल्याचे त्यांनी सुप्रीम कोर्टात सांगितले.