सर्जिकल स्ट्राइक हे समोरच्याला अनपेक्षित धक्का देण्याचे अस्त्र आहे. त्यातले धक्का तंत्र तसेच टिकून राहिले पाहिजे असे लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत रविवारी म्हणाले. भारत पाकिस्तानमध्ये आपले विशेष कमांडो पाठवून २०१६ सारखा पुन्हा सर्जिकल स्ट्राइक करणार का ? या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिले. दोन वर्षांपूर्वी भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी तळांवर सर्जिकल स्ट्राइककरुन उरी दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला होता. त्यावेळी भारताच्या कमांडो कारवाईत अनेक दहशतवादी मारले गेले होते.

बीएसएफ जवान नरेंद्र सिंह यांची पाकिस्तानी सैन्याने हत्या केली त्यापार्श्वभूमीवर बोलताना जनरल रावत म्हणाले कि, पाकिस्तानी सैन्याने पहिल्यांदा असे क्रूर कृत्य केलेले नाही. त्यांच्या लष्कराला अशी कृत्य करण्याची सवयच आहे. मागच्या आठवडयात जम्मूमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेजवळ नरेंद्र सिंह यांचा पाकिस्तानी सैन्याने छळ करुन हत्या केली होती. पाकिस्तान काश्मीर खोऱ्यातील शांतता भंग करुन काश्मिरी युवकांना कट्टरपंथीय विचारधारेच्या दिशेने नेत असल्याबद्दल त्यांनी पाकिस्तानवर अत्यंत बोचऱ्या शब्दात टीकेचे आसूड ओढले.

पाकिस्तानला काश्मीर खोऱ्यात शांतत नकोय, त्यांना हिंसाचार हवा आहे असे रावत म्हणाले. पाकिस्तान बरोबर चर्चा रद्द करण्याचा मोदी सरकारचा निर्णय योग्य असल्याचे त्यांनी सांगितले. दहशतवाद आणि शांतता चर्चा एकाचवेळी होऊ शकत नाही असे त्यांनी सांगितले.

पाकिस्तानी दहशतवाद्यांनी सीमेवर भारतीय जवानाची हत्या करून त्याच्या मृतदेहाची विटंबना केल्याच्या कृत्याचा बदला घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी शनिवारी जयपूर येथे केले. पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून भारतीय जवानाचा शिरच्छेद केला जाणे आणि जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने जुलै २०१६ मध्ये ठार मारलेला हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या बुऱ्हान वाणी याच्या नावाने पोस्टाचे तिकिट जारी करणे या कृत्यांवर जनरल रावत प्रतिक्रिया देत होते.