भारतीय लष्कराने बुधवारी मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. त्यानंतर चवताळलेल्या पाकिस्तानच्या सीमा भागात हालचाली वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय सुरक्षा दलाकडून गुरूवारपासून बैठकांचा सपाटा सुरू झाला आहे. शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत ते नियंत्रण रेषा (एलओसी) आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरील परिस्थितीचा आढावा घेतील, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान पाकिस्तानने सर्जिकल स्ट्राईक झाले नसल्याचे सांगितले असले तरी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनीही कॅबिनेट बैठक बोलावली आहे.
केंद्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीत मंत्रिमंडळातील सर्व प्रमुख मंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, परराष्ट्र सचिव आदींसह भारतीय सेनेचे उच्चपदस्थ अधिकारी यात सामील होतील. या बैठकीत सीमेवरील परिस्थितीचा आढावा घेतला जाईल. गुरूवारीही गृहमंत्री राजनाथ सिंह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैन्याच्या तयारीचा आढावा घेतला होता. भारतीय सुरक्षा दलातील हालचालींनाही वेग आला आहे.
दरम्यान गृहमंत्री राजनाथ सिंह गृहमंत्री राजनाथ सिंह हे इंडोतिबेटीयन बॉर्डर पोलीस दलाच्या उच्च अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. या बैठकीत ते सीमेवरील सुरक्षेचा आढावा घेतील. भारताच्या पश्चिम किनारपट्टीला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरवर्षी मुंबई नौदलाच्या मुख्यालयात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यंदा हे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.