गुरुवारी दिल्लीत राष्ट्रपती भवनात नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला. गुरुवारी ५८ जणांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली असून या यादीतील ५६ वे नाव हे लक्षवेधी ठरले आहे. ओडिशातील बालासोर मतदारसंघातून खासदार झालेले प्रतापचंद्र सारंगी हे शपथविधीसाठी मंचावर आले आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले. विशेष म्हणजे सारंगी यांना ओडिशातील मोदी म्हणून ओळखले जाते.
ओडिशासारख्या तुलनेत मागास राज्यातील बालासोर मतदारसंघातून खासदार बनलेले प्रतापचंद्र सारंगी यांनी गेली कित्येक वर्षे सामाजिक कार्यात घालवलेली आहेत. सारंगी यांचा अध्यात्माकडे अधिक ओढा असून साधू बनण्यासाठी ते अनेकदा रामकृष्ण मठात गेले मात्र, आईची सेवा करावी असे त्यांना सुचवण्यात आले. त्यानंतर त्यांनी लोकसेवासाठी स्वत:ला झोकून दिले. उडिया आणि संस्कृत भाषेवर त्यांचे प्रभुत्व आहे. काही दिवसांपूर्वी खासदार म्हणून निवडून आल्यावर सारंगी यांचे एक छायाचित्र व्हायरल झाले होते. कोणताही बडेजाव न करता अंगावर साधा कुर्ता आणि खांद्यावर बॅग घेऊन ते दिल्लीसाठी रवाना झाल्याचे छायाचित्रात दिसत होते.
सारंगी हे अत्यंत साधेपणाने आयुष्य जगतात. निवडणुकीचा प्रचारदेखील त्यांनी सायकलद्वारे केला होता. त्यांच्यासमोरील दोन्ही उमेदवार हे धनदांडगे होते. यात नवज्योती पटनायक यांचा समावेश होता. नवज्योती पटनायक हे काँग्रेसचे ओडिशातील प्रदेशाध्यक्ष निरंजन पटनायक यांचे पूत्र आहेत. नवज्योती पटनायक यांची संपत्ती १०४ कोटी रुपये इतकी असून बिजू जनता दलाचे रविंद्र जेना यांची संपत्ती ७२ कोटी रुपये इतकी होती.
सारंगी यांच्याकडे फक्त साडे सोळा लाख रुपयांची मालमत्ता असल्याचे त्यांनी उमेदवारी अर्ज भरताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. सारंगी यांनी ग्रामीण भागात शिक्षणासाठी काम केले असून दारुबंदीसाठीही त्यांनी मोहीम राबवली होती. सारंगी हे ओडिशात विश्व हिंदू परिषदेत सक्रीय होते. त्यांनी बजरंग दलाचे ओडिशातील अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. आता सारंगी यांना मंत्रिमंडळात कोणते खाते दिले जाते, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.