टी. ससिंद्रा यांच्यासाठी गाडी चालवणे ही कधीच क्रेझ वाटेल अशी गोष्ट नव्हती. चारचाकी चालविण्याच्या क्षेत्रात फार कमी महिला असल्याचे लक्षात आल्यावर ९० च्या दशकात त्यांनी हे काम करायचे ठरवले. प्रेमसंबंध आणि त्यानंतर लग्न झालेल्या ससिंद्रा यांना आर्थिकदृष्ट्या स्वत:च्या पायावर उभे असणे आवश्यक होते. त्यामुळे त्यांनी मारुती ८०० शिकण्यास सुरुवात केली. पण आज गरज म्हणून शिकलेले हे काम त्यांना उद्या मुख्यमंत्र्यांची गाडी तीही ओपन जीप आणि पासिंग आऊट परेडदरम्यान चालविण्याची संधी देईल असे त्यांना स्वप्नातही वाटले नव्हते.

पण मंगळवारी ४९ वर्षांच्या ससिंद्रा यांना ही संधी मिळाली. केरळच्या त्रिसुर येथील रामवर्मापुरम पोलीस अकादमीमध्ये पासिंग आऊट परेडकडून अभिवादन स्विकारताना केरळचे मुंख्यमंत्री पिनराई विजयन यांची जीप ससिंद्रा चालवत होत्या. राज्याच्या पोलीस दलातर्फे महिला बटालियनच्या नव्याने सुरु करण्यात आलेल्या बॅचची पासिंग आऊट परेड होती. त्यामुळे ससिंद्रा यांच्यासाठी ही अतिशय वैशिष्टपूर्ण संधी होती. ससिंद्रा यांच्या पतीचे कार ड्रायव्हींग स्कूल असून त्यांना एक मुलगीही आहे.

मुख्यमंत्र्यांची जीप चालवायला मिळाल्याच्या प्रसंगाबाबत बोलताना ससिंद्रा म्हणाल्या, माझ्या आयुष्यातील हा अतिशय विशेष क्षण असून मुख्यमंत्र्यांचे वाहन चालविणे ही मोठी जबाबदारी होती. अशावेळी तुम्ही थोडीही चूक करु शकत नाही. तसेच जीपला अजिबात जर्क बसणार नाही अशापद्धतीने चालवावी लागते. त्यामुळे यासाठी मी मानसिकदृष्ट्या तयार होते. यासाठी मी तीन आठवड्यांचे प्रशिक्षण घेतले होते. मी रोज सकाळी आणि संध्याकाळी गाडी चालवण्याचा सराव करत होते. सध्या त्या त्रिसुरमधील आयुक्तांच्या कार्यालयात नोकरी करत असून पोलीस दलातील त्यांचे हे १४ वे वर्ष आहे. मला दिलेली दिलेली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडत, माझ्या विभागाने माझ्यावर दाखविलेल्या विश्वासास मी पात्र ठरली आहे असेही ससिंद्रा म्हणाल्या. दुसऱ्या दिवशी ससिंद्रा यांचा सर्व माध्यमात फोटो आल्यने बाकीच्यांसाठी ही गोष्ट अतिशय क्षुल्लक असली तरीही माझ्यासाठी ही संधी खूप मोठी होती अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.