‘ताज महाल’ हे आयसिसच्या दहशतवाद्यांचे लक्ष्य असल्याचे वृत्त माध्यमांनी दिल्याने १७व्या शतकातील या जगप्रसिद्ध स्मारकाभोवतीच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. ताज महाल हे आयसिसचे लक्ष्य असल्याचा इशारा देण्यात आला आहे, या इशाऱ्याची आम्ही खातरजमा करीत आहोत. तथापि, स्मारकाभोवतीच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे, असे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) दलजितसिंग चौधरी यांनी सांगितले. ताज महालचे चित्र दाखवून तेथे एक दहशतवादी हातात शस्त्र घेऊन उभा असल्याचे एका संकेतस्थळावर दर्शविण्यात आल्याने सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. आयसिस समर्थक एका माध्यम समूहाने ताज महालचे चित्र दाखवून त्याला या दहशतवादी संघटनेकडून लक्ष्य करण्यात येणार असल्याचे वृत्त दिले आहे. उत्तर प्रदेशात सुरक्षा यंत्रणांनी कारवाई करून सैफुल्ला या दहशतवाद्याला ठार करून अन्य सहा दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर एका आठवडय़ाने ताज महालचे छायाचित्र जारी करण्यात आले आहे. आयसिसने ऑनलाइनच्या माध्यमातून सैफुल्लाचे मतपरिवर्तन केले आणि त्याने भोपाळमध्ये रेल्वेत स्फोट घडविला, असे सांगण्यात येत आहे. आयसिसचा एक दहशतवादी चेहऱ्यावर काळा कपडा टाकून आणि हातात बंदूक घेऊन ताज महालजवळ उभा असल्याचे चित्रांत दिसत आहे. ‘नवे लक्ष्य’ अशा अक्षरांमध्ये ताज महालचे चित्र, त्याखाली ‘आग्रा इश्तिशादी’ असे इंग्रजीमध्ये आणि बॉम्बचे चित्र अशी अन्य तीन चित्रेही संकेतस्थळावर दाखविण्यात आली आहेत. परदेशी आणि देशी पर्यटकांचे आकर्षण केंद्र असलेल्या ताज महालची अंतर्गत सुरक्षा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे आहे. तर बाहेरील सुरक्षा प्रांतीय सशस्त्र दलाकडे आहे. बाहेर ५०० मीटर सुरक्षा चक्रात पोलीस पथके वाहनांवर बारकाईने लक्ष ठेवत आहेत.