अफगाणिस्तानात तालिबानच्या दहशतवादी कारवायांमध्ये अलीकडे मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सोमवारी पूर्व अफगाणिस्तानात दोन पोलिसांची हत्या केल्यानंतर तालिबानी दहशतवाद्यांनी एका सरकारी कार्यालयात घुसून हल्ला केला.
   वर्षभरातील विशिष्ट एक काळ निश्चित करून सरकारी कार्यालये तसेच नागरी वस्त्यांवर तालिबान हल्ला करत आहे. दक्षिण अफगाणिस्तान हा तालिबान्यांचा बालेकिल्ला समजला जातो. तालिबान दहशतवाद्यांनी हेलमंड येथील पोलीस चौकीवर केलेल्या हल्ल्यात नऊ पोलीस कर्मचारी ठार झाले होते.
    याच काळात काबुल आंतरराष्ट्रीय विमानतळावर दहशतवाद्यांनी रॉकेटहल्ला केला होता, परंतु यात कोणतीही हानी झाली नव्हती. जलालाबाद येथे न्याय मंत्रालयाच्या इमारतीवरही तालिबान्यांनी सकाळच्या सत्रात हल्ला चढवला. या वेळी अनेक कार्यालयांमध्ये कर्मचारी हजर झालेले होते.
 दहशतवाद्यांना हुसकावून लावण्यासाठी अफगाण पोलीसदलाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर पोलिसांची दहशतवाद्यांशी चकमक उडाल्याचे जनरल फाजल अहमद शेरजाद यांनी सांगितले.
काबुल शहराच्या पूर्वेला बगराम येथील नाटोच्या तळावरही रॉकेटहल्ला केला होता. यंदा अफगाणिस्तानात अध्यक्षीय निवडणूक होऊ घातली आहे. त्यामुळे येथील नागरिकांसाठी हा महत्त्वाचा काळ आहे. अशा संवेदनशील परिस्थितीत तालिबानने आपल्या दहशतवादी कारवायांच्या माध्यमातून डोके वर काढले आहे. २०१४ सालच्या अखेरीस अफगाणिस्तानातील आंतरराष्ट्रीय फौजा मागे घेण्यात येणार आहेत. या पाश्र्वभूमीवर तालिबान नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करून सरकारी यंत्रणा कमकुवत करत आहे.