अफगाणिस्तानात तालिबाननं नुकतच हंगामी सरकार स्थापन केलं आहे. २० वर्षांपूर्वी अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता होती. या कार्यकाळात असलेल्या दहशतीच्या अनुभव तिथल्या नागरिकांना आहे. त्यामुळे अनेकांनी अफगाणिस्तानातून पलायन केलं आहे. आता सत्ता स्थापन केल्यानंतर तालिबाननं आपलं खरं रुप दाखवण्यास सुरुवात केली आहे. तालिबानी राजवटीत महिलांचे अधिकार कमी करण्यात आले आहेत. हंगामी सरकारमध्ये एकाही महिलेला स्थान देण्यात आलं नाही. तसेच हिजाब घालण्याची सक्ती करण्यात आली आहे. दुसरीकडे एका मुलाखतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत तालिबानचा सदस्य हिजाब न घातलेल्या महिलांची तुलना कापलेल्या कलिंगडाशी करत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

“तुम्ही कापलेलं कलिंगड की पूर्ण कलिंगड खरेदी करता?, तसंच हिजाब न घातलेली स्त्री ही कापलेल्या कलिंगडासारखी आहे”, असं तालिबानी सदस्य व्हायरल व्हिडिओत सांगत आहे.

या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या शैलीत उत्तर दिली आहेत. हा व्हिडिओ रिट्वीट करत आपली रोखठोक मत मांडली आहेत.

गेल्या महिन्यात १५ ऑगस्ट रोजी काबूल पडलं आणि तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर पूर्णपणे आपला अंमल प्रस्थापित केल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर जवळपास तीन आठवड्यांनंतर तालिबान्यांनी आपलं काळजीवाहू सरकार स्थापन झाल्याचं घोषित केलं. संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवाद्यांच्या यादीमध्ये ज्याचं नाव आहे असा मुल्ला मोहम्मद हसन अखुंद हा आता तालिबानच्या या नव्या सरकारचा पंतप्रधान आहे. त्यामुळे समस्त जगच दहशतवाद्यांनी स्थापन केलेल्या या सरकारकडे काळजीने, शंकेने आणि भितीने पाहात आहे.