तालिबानने अफगाणिस्तान सरकारशी शांतता चर्चेच्या नव्या चर्चेचे वृत्त फेटाळून लावले असून नेता मुल्ला ओमर याच्या मृत्यूबाबत प्रतिक्रिया देण्यास तालिबानने नकार दिला. अफगाणिस्तानने काल ओमरचा मृत्यू दोन वर्षांपूर्वी पाकिस्तानमध्ये झाल्याची माहिती काल दिली होती. मात्र, या संदर्भात काही सशस्त्र संघटनांच्या सूत्रांकडून ओमरचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते. दहशतवादी संघटनेकडून अद्याप ओमरच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आलेला नाही. दोन दिवसांपूर्वी तालिबान आणि अफगाणिस्तान सरकार यांच्यात नव्याने चर्चा होणे अपेक्षित होते.तालिबानने आपल्या संकेतस्थळावर सांगितले की, प्रसारमाध्यमांनी अफगाण सरकारसोबत आमच्या चर्चा होणार असून या चर्चेचे ठिकाण चीन किंवा पाकिस्तान असेल असे म्हटले आहे. मात्र, याबाबत अद्याप आमच्याशी कुठलीही चर्चा करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रसारमाध्यमांचे वृत्त खोडसाळपणाचे आहे.