पाकिस्तान सरकारशी तालिबान्यांची  चर्चा सुरू असतानाच कमाण्डर मुल्ला फझलुल्ला याला पाकिस्तानचे नेतृत्व करून द्यावे, अशी सूचना तेहरीक-ए-तालिबान या  संघटनेने केली आहे. पाकिस्तानात शरीयत कायदा लागू करण्यात यावा, अशीही मागणी या संघटनेने केली आहे.
 त्यांच्या या सूचनेमुळे चर्चेवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मुल्ला फझलुल्ला आमचे नेतृत्व करतो आणि पाकिस्तानचे नेतृत्व करण्याचे त्याच्यात चांगले गुण आहेत, या शब्दांत तेहरीकचा प्रवक्ता शाहीदुल्ला शाहीद याने आपल्या म्हणण्याचे समर्थन केले. शरीयत कायद्यासाठी जे दहशतवादी पाकिस्तानात लढा देत आहेत, त्यांच्यासाठी अफगाणी तालिबानचा नेता मुल्ला ओमर हा निष्ठावंतांचाच नेता आहे, असा दावा शाहीद याने केला.
शरीयत कायद्याच्या अंमल-बजावणीसाठी पाकिस्तानची निर्मिती करण्यात आली आणि म्हणूनच पाकिस्तानात शरीयतचा कायदा लागू करण्यात यावा, अशीही मागणी शाहीद याने केली. पाकिस्तान सरकारसमवेत याआधीची बोलणी असफल ठरली तरी यापुढेही ती सुरू राहतील. याचे कारण म्हणजे सरकार त्यासंबंधी गंभीर नव्हते आणि त्यांच्यावर परकीयांचा दबाव होता, असा दावा शाहीद याने केला.
पाकिस्तानी तालिबानी संघटना सरकारसमवेत दोन कारणांनी लढा देत आहे. एक म्हणजे, त्यांनी अमेरिकेसमवेत मैत्रीचे संबंध ठेवले आहेत आणि येथे गैर-इस्लामी व्यवस्था सुरूच असून या दोन्ही बाबींना आमचा विरोध आहे, असे शाहीदने स्पष्ट केले.