गणपती बाप्पा हे तर सगळ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत, भारतातही गणपतीची पूजा केली जाते आणि जगभरातही अनेक देशात गणपतीची पूजा मनोभावे केली जाते. मात्र गणपती बाप्पा हा इम्पोर्टेड आहे असे म्हणणाऱ्या दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तामिळ सिनेमा सृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक पी. भारतीराजा यांनी जानेवारी महिन्यात झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात हे वक्तव्य केले होते. याच प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंदू मक्कल मुन्नानी या संघटनेने धार्मिक भावना दुखावल्या गेल्या प्रकरणी पी. भारतीराजावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. भारतीराजा यांनी गणपती बाप्पा बाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी या संघटनेने केली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

दरम्यान मद्रास हायकोर्टाने या तक्रारीनंतर भारतीराजा यांना अटकपूर्व जामीनही मंजूर केला आहे. पोलिसांनी हे सगळे प्रकरण घडल्यानंतर गुन्हा दाखल करण्यासाठी चार महिने लावले. या प्रकरणाची तक्रार १९ जानेवारी रोजीच करण्यात आली होती असे म्हणत भारतीराजा यांना जामीन मंजूर केल्याचे जस्टिस पी राजामनिकम यांनी म्हटले आहे. भारतीराजा यांनी गणपतीबाप्पा बद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यावर १९ जानेवारीलाच व्ही. जी. नारायणन यांनी तक्रार नोंदवली होती. त्यानंतर FIR दाखल करण्यासाठी पोलिसांनी चार महिने का लावले असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.