तामिळनाडुतील ऑल इंडिया अण्णा द्रमुक मुन्नेत्र कळघम (एआयएडीएमके) सरकारने माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांना सोडून देण्यासाठी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्याकडे शिफारस करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, केंद्र सरकारने राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांना सोडण्याच्या निर्णयाला विरोध केला होता.

तामिळनाडू सरकारमधील मंत्री डी. जयकुमार म्हणाले की, मुख्यमंत्री ई के पलानीसामी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राजीव गांधी हत्याकांडातील दोषींना मुक्त करण्याचे आदेश द्या अशी शिफारस करण्यात येणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडूच्या राज्यपालांना राजीव गांधी हत्याकांडातील दोषी ए जी पेरारिवनच्या दया याचिकेवर विचार करण्यास सांगितले होते. न्या. रंजन गोगोई, नवीन सिन्हा आणि के एम जोसेफ यांच्या खंडपीठाने केंद्र सरकारच्या याचिकेवर हे निर्देश दिले होते.

केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला राजीव गांधी हत्याकांडातील सात दोषींना मुक्त करण्याच्या तामिळनाडू सरकारच्या प्रस्तावाला विरोध केला होता. या गुन्हेगारांच्या शिक्षा माफीमुळे एक घातक परंपरेची सुरूवात होईल आणि त्याचे आंतरराष्ट्रीय परिणाम भोगावे लागतील, असे केंद्राने म्हटले होते.