पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानच्या (एम्स) पायाभरणीसाठी तामिळनाडूतील मदुराई येथे आले होते. पण त्यापूर्वीच सोशल मीडियावर त्यांच्या दौऱ्याच्या विरोधात #GoBackModi ट्रेंडिंग झाले होते. ट्विटर युजर्सनी मीम्स, व्यंगचित्र, छायाचित्रे आणि काही व्हिडिओच्या माध्यमातून पंतप्रधानांवर निशाणा साधला आणि दिल्लीला परतण्याचे आवाहन केले.

गाजा चक्रीवादाळामुळे लोकांनी मोदींप्रती आपली नाराजी दर्शवली. गाजा वादळामुळे राज्यातील सुमारे ३ लाख लोक बेघर झाले होते. तर ११ लाख वृक्ष उन्मळून पडले होते. राज्यातील विविध जिल्ह्यात चक्रीवादाळामुळे जनजीवन प्रभावित झाले होते. मात्र, मोदी त्यावेळी चक्रवात प्रभावित जिल्ह्यात आले नव्हते. त्यामुळे लोकांनी ट्विटरशिवाय फेसबुकवरही Go Back Modi ट्रेंड केला. दरम्यान, मोदींच्या दौऱ्याचा जागोजागी विरोध करण्यात आला. मदुराई येथे एमडीएमकेचे प्रमुख वायको यांनी आंदोलन केले. अनेक ठिकाणी ‘मोदी गो बॅक’चे नारे देण्यात येते होते. अनेक ठिकाणी त्यांच्या विरोधात पोस्टर्स लावण्यात आले होते.

मोदींना दुसऱ्यांदा अशा पद्धतीच्या विरोधाचा सामना करावा लागला आहे. गेल्यावर्षी एप्रिलमध्ये मोदी हे चेन्नई येथील डिफेन्स एक्स्पो येथे आले होते. त्यावेळीही #GoBackModi ट्विटरवर ट्रेंड झाला होता. इतकेच नव्हे तर विरोधीपक्षाशी निगडीत अनेक संघटनांनी हवेत काळे फुगे सोडले होते.