देशात दलितांचा असाही एक समूह आहे ज्यांना अनुसूचित जाती, जमातीच्या सूची बाहेर पडायचे आहे. तामिळनाडू स्थित या दलित समाजाच्या सदस्यांच्या मते, आरक्षण एका कलंकाप्रमाणे आहे. या कलंकामुळे समाजात निष्कासनाचा त्रास सहन करावा लागतो. दलितांकडे फक्त ‘व्होट बँक’ म्हणूनच पाहिले जाते. आम्हाला हे आता बदलायचे आहे. त्यामुळे आम्हाला या प्रवर्गातून स्वत:हून बाहेर पडायचे आहे.

देवेंद्र कुला वेल्लार जातीशी संबंध असलेल्या या समूहाचे सुमारे एक लाखांहून अधिक सदस्य आहेत. या सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी ६ मे रोजी ते आपल्या मागणीसाठी पुठिया तामिळगाम पक्षाच्या फलकाखाली आंदोलन करणार आहेत. पक्षाचे सदस्य विरधुनगर येथे एकत्रित येतील आणि अनुसूचित जातीतून आम्हाला वेगळे करा अशी मागणी करतील. पुठिया तामिळगाम पक्षाचे नेते कृष्णास्वामी म्हणाले की, समाजात देवेंद्र कुला वेल्लार समाजाच्या लोकांबरोबर अस्पृश्यता पाळली जाते. त्यामुळे त्यांना आपली ही ओळख पुसायची आहे.

द्रमूक आणि अण्णाद्रमूकच्या दोन्ही सरकारांनी आतापर्यंत देवेंद्र कुला वेल्लार समाजाच्या लोकांचे अधिकार दाबल्याचे कृष्णास्वामी यांनी गतवर्षीच माध्यमांशी बोलताना म्हटले होते. हे दोन्ही पक्ष निवडणुकीपुरता या समाजाचा वापर करत असल्याचा आरोप केला होता.

आरक्षणावरून देशात अनेक दलित संघटना सध्या केंद्र सरकारवर नाराज आहेत. संविधानात एससी/एसटीला मिळणाऱ्या आरक्षणाच्या नियमांशी छेडछाड केल्याचा आतापर्यंत विविध सरकारवर आरोप करण्यात आलेले आहेत. अशात एका दलित समाजाला स्वत:हून अनुसूचित जाती सूचीतून बाहेर पडायचे आहे.