भारतात निर्वासित म्हणून वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांचा व्हिसा आणखी वर्षभरासाठी वाढवण्यात आला आहे. तस्लिमान नसरीन २००४ पासून भारतात वास्तव्य करत आहेत. मूळच्या बांगलादेशी असणाऱ्या तस्लिमा नसरीन यांना कट्टरपंथियांनी काढलेल्या फतव्यामुळे भारतात वास्तव्य करावे लागते आहे. भारत हा देश म्हणजे माझे दुसरे घर आहे असे तस्लिमा नेहेमी सांगतात. त्यांचा नवा व्हिसा २३ जुलै २०१७ पासून सुरु लागू होणार आहे. तसेच त्याची मुदत पुढच्या वर्षभराची असणार आहे अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी तस्लिमा नसरीन यांच्या व्हिसा मुदतवाढीवर शिक्कामोर्तब केले आहे.

तस्लिमा नसरीन यांनी ११९४ मध्ये लज्जा ही कादंबरी लिहीली. यामुळे कट्टरपंथिय चांगलेच चिडले आणि त्यांना मोठ्या प्रमाणावर टीकाही सहन करावी लागली. ही टीका आणि नसरीन यांच्याविरोधातले फतवे एवढे जहाल होते की, तस्लिमा नसरीन यांनी देश सोडला. लज्जा या त्यांच्या कादंबरीत बाबरी मशिद पाडली गेल्यानंतर बांगलादेशात मुस्लिम दंगे कसे उसळले होते त्याचे वर्णन आहे. याच कादंबरीमुळे त्या चर्चेतही आल्या होत्या आणि त्यांच्याविरोधात फतवाही निघाला होता. काही वर्षे त्या कोलकातामध्ये राहिल्या. मात्र तिथेही त्यांना विरोध झाला त्यामुळे त्यांनी कोलकाताही सोडले.

तस्लिमा नसरीन यांचा जन्म २५ ऑगस्ट १९६२ ला बांगलादेशातल्या मयमनसिंह शहरात झाला. विद्यार्थी दशेपासूनच त्यांनी कविता लिहीण्यास सुरुवात केली. पाच खंडात त्यांनी लिहीलेले आत्महचरित्रही वादाचा विषय ठरले होते. मुस्लिम कट्टरपंथियांनी केलेल्या विरोधानंतर आपल्या आत्मचरित्रातून त्यांना मोहम्मद पैगंबरांशी संबंधित असलेला एक प्रसंग हटवावा लागला होता. तस्लिमा नसरीन यांनी अनेकदा भारतीय नागरिकत्त्वाची मागणी केली आहे. मात्र सरकारने ते त्यांना दिलेले नाही. तस्लिमा यांच्याकडे स्वीडनचेही नागरिकत्त्व आहे. मात्र त्या भारतातच वास्तव्य करणे पसंत करतात. या कारणामुळेच त्यांना त्यांच्या व्हिसाची मुदत वारंवार वाढवून घ्यावी लागते.