रोहिंग्या मुस्लिमांना बांग्लादेशकडून जो आश्रय दिला जातो आहे तो माणुसकीच्या दृष्टीकोनातून अजिबात नाहीये. हा आश्रय फक्त मतं डोळ्यासमोर ठेवून देण्यात आला आहे अशी खरमरीत टीका वादग्रस्त लेखिका तस्लिमा नसरीन यांनी केली आहे. आपल्या तिखट ट्विटच्या माध्यमातून तस्लिमा नसरीन यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर शाब्दिक वार केले आहेत. शेख हसीना या त्यांची व्होट बँक वाढवण्यासाठी हे माणुसकीचे नाटक करत आहेत. म्यानमारचे हे लोक जर हिंदू, बौद्ध किंवा ख्रिश्चन असते तर त्यांना माणुसकीच्या दृष्टीकोनातून शेख हसीना यांनी मदत केली असती का? असाही प्रश्न नसरीन यांनी उपस्थित केला.

म्यानमारमध्ये उसळलेल्या हिंसाचारामुळे सुमारे ४ लाख रोहिंग्या मुस्लिमांनी बांगलादेशात आश्रय घेतला. मागील चार आठवड्यांपासून बांगलादेशात स्थलांतरीत झालेल्या या सगळ्या रोहिंग्या मुस्लिमांसाठी छावण्यांची व्यवस्था करण्यात आली. आता पुढील काही दिवसांमध्ये सीमा भागात असलेल्या २ हजार एकर जमिनीवर आणखी छावण्या उभारण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. एकूण १४ हजार छावण्या उभारण्यात येणार आहेत. बांगलादेशाचे सैन्यदल आणि आंतरराष्ट्रीय संघटनांच्या मदतीने या छावण्याची निर्मिती करण्यात येते आहे.

सध्या सुरू करण्यात आलेल्या छावण्यांमधील रोहिंग्या मुस्लिमांचे प्रमाण क्षमतेपेक्षा जास्त झाल्यानेच नव्या छावण्यांची निर्मिती सुरु करण्यात आली. मात्र बांगलादेश हे सगळे माणुसकीच्या दृष्टीकोन समोर ठेवून नाही तर मतांचे राजकारण समोर ठेवून करत असल्याचा आरोप तस्लिमा नसरीन यांनी केला आहे.

तस्लिमा नसरीन या वादग्रस्त बांगलादेशी लेखिका आहेत. त्यांची ‘लज्जा’ ही कादंबरी चांगलीच वादग्रस्त ठरली. ज्यामुळे बांगलादेशने त्यांच्याविरोधात फतवा काढून त्यांना देशाबाहेर हाकलले. तेव्हापासून त्यांनी भारतात आश्रय घेतला आहे. कोलकाता येथील मुस्लिमांनी विरोध केल्यावर त्यांनी काही काळ दिल्ली आणि काही काळ स्वीडनमध्येही वास्तव्य केले. त्यांनी भारताचे नागरिकत्त्व मिळावे म्हणून अर्जही केला आहे. मात्र भारताने अद्याप त्यांना नागरिकत्त्व दिलेले नाही. आता शेख हसीनांवर टीका केल्यामुळे त्या पुन्हा चर्चेत आल्या आहेत.