आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलगु देसम पार्टीचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसबरोबर हातमिळवणी केली आहे. दिल्ली दौऱ्यावर आलेल्या चंद्राबाबू नायडू यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी प्रसारमाध्यमांसमोर येऊन युतीची घोषणा केली. देश आणि लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही एकत्र येत आहोत. आम्हाला भूतकाळ विसरावा लागेल. आता एकत्र येणे लोकशाहीमध्ये आवश्यक बनले आहे. त्यामुळे आम्ही एकत्र येत आहोत. सर्व विरोधी पक्ष एकत्र झाला पाहिजे असे चंद्रबाबू नायडू याप्रसंगी म्हणाले.

चंद्राबाबू नायडू यांना टीडीपी पक्ष गेली अनेकवर्ष भाजपा प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये होता. काही महिन्यांपूर्वी मोदी सरकारबरोबर मतभेद झाल्यानंतर टीडीपी सरकारमधून बाहेर पडला. टीडीपी एकेकाळी भाजपाचा विश्वासू सहकारी होता. त्यामुळे टीडीपीची काँग्रेसबरोबर हातमिळवणी भाजपासाठी एक झटका आहे.

चंद्राबाबू नायडूंबरोबर चांगली चर्चा झाली. देशाचे भविष्य आणि लोकशाही वाचवणे हाच या बैठकीचा मतितार्थ आहे असे राहुल म्हणाले. आम्ही भूतकाळात काय घडले त्यामध्ये पडणार नाही. वर्तमानकाळ आणि भविष्याबद्दल चर्चा करु. सध्या देशात जी परिस्थिती आहे ती लक्षात घेता नवा दृष्टीकोन देण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र आले पाहिजे असे गांधी म्हणाले.