लोकसभा निवडणूक २०१९ चा बिगुल रविवारी (१० मार्च रोजी) वाजला. निवडणूक आयोगाने देशातील ५४३ लोकसभा मतदारसंघासाठी निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. विज्ञान भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी टप्प्यानुसार निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. एकूण ७ टप्प्यात या निवडणुका होणार असून निवडणुकीची घोषणा होताच देशभरात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. देशभरात आचारसंहिता लागू झाल्यानंतर सर्वच पक्षांना आपले बॅनर्स आणि पोस्टर्स काढावे लागले आहे. आंध्रप्रदेश सरकारमधील नेत्याने चक्क सरकारी कार्यलयांमधील सिलिंग फॅन काढण्याची मागणी केली आहे.

एप्रिल ११ ते ११ मे दरम्यान लोकसभेसाठी देशभरामध्ये सात टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. आंध्रप्रेशमध्ये ११ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातच मतदान होणार आहे. भर उन्हाळ्यात मतदान होणार असल्याने निवडणुकीसाठी काम करणाऱ्यांना उकाड्याचा प्रचंड त्रास होणार आहे. असे असतानाच आता आंध्रप्रदेशमधील सत्ताधारी तेलगू देसम पक्षाच्या (टीडीपी) नेत्यांनी सरकारी कार्यालयांमधील सिलींग फॅन काढण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्या कुप्पम मतदारसंघातील नेत्यांनी ही मागणी केली आहे. सरकारी कार्यलयांमधील सिलिंग फॅन पाहून मतदान करणाऱ्या मतदारांच्या निर्णयावर परिणाम होऊ शकतो असं या नेत्यांचे म्हणणे आहे. तेलगू देसम पक्षाचा प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या जगन्न मोहन रेड्डी यांच्या व्हायएसआर काँग्रेस पक्षाची निवडणूक निशाणी सिलींग फॅन असल्याने टीडीपीने ही मागणी केली आहे.

या आठवड्यामध्ये टीडीपीचे रामाकुप्पम मंडळातील काही नेते तहसीलदार कार्यलायातील सिलिंग फॅन काढण्याच्या उद्देशाने कार्यालयात घुसले होते. सर्व सरकारी कार्यालयांमधील सिलींग फॅन काढावेत अशी घोषणाबाजीही या नेत्यांनी केली. तहसीलदारांना दिलेल्या निवेदनामध्ये सिलींग फॅन हे व्हायएसआर काँग्रेस पक्षाचे निवडणूक चिन्ह असल्याने सरकारी कार्यालयात येणारे लोक फॅन पाहून संबंधित पक्षाला मतदान करु शकतात. याच शक्यतेमुळे सर्व सरकारी कार्यालयांमधून सिलींग फॅन लवकरात लवकर काढून टाकावे अशी मागणी केली आहे. एकीकडे सिलींग फॅन काढण्याची मागणी टीडीपीने केली असतानाच टीडीपीचे निवडणूक चिन्ह असणाऱ्या सायलक तसेच जनसेना पक्षाचे चिन्ह असणाऱ्या ग्लास च्या वापरावरही बंदी का आणू नये अशी चर्चा रंगू लागली आहे.

रामाकुप्पमच्या तहसीलदारांनी द न्यूज मिनिट या वेबसाईटशी बोलताना आपल्याला सरकारी कार्यालयांमधील सिलींग फॅन काढण्यासंदर्भातील निवेदन मिळाल्याची माहिती दिली. ‘सिलींग फॅन हे पक्षाचे निवडणूक चिन्ह असल्याने सरकारी कार्यलयांमध्ये येणारे मतदार ते पाहून प्रभावित होऊ शकतात. आम्ही हे निवेदन संबंधित विभागाला दिले असून या तक्रारींवर निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला असतो,’ अशी माहिती तहसीलदारांनी दिली.