आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्याच्या जडणघडणीत आणि वाटचालीत शिक्षकांचा महत्त्वपूर्ण वाटा असतो. आज शिक्षकदिनानिमित्त अनेकांकडून शिक्षकांबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. एखादा विशेष दिवस किंवा क्षणाचे अनोख्या आणि कलात्मक पद्धतीने सादरीकरण करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या गुगलकडून शिक्षकदिनानिमित्त खास डुडल तयार करण्यात आले आहे. या डुडलमध्ये पेन्सिल्सच्या माध्यमातून डुडल साकारण्यात आले आहे. पेन्सिल्सच्या रूपातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे हे डुडल अत्यंत लक्षवेधी आहे. पेन्सिलरूपी शिक्षक विद्यार्थ्यांचा गृहपाठ तपासत आहेत, असे या डुडलमध्ये दिसत आहे.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस देशभरात शिक्षक दिन (५ सप्टेंबर) म्हणून साजरा केला जातो. डॉ. राधाकृष्णन भारताचे दुसरे राष्ट्रपती होते. देशातील सर्वोत्तम मनाच्या व्यक्ती शिक्षक असल्या पाहिजेत, असे डॉ. राधाकृष्णन यांचे मत होते. ते राष्ट्रपतीपदी असताना त्यांनी एकदा म्हटले होते की, माझा वाढदिवस शिक्षकदिन म्हणून साजरा झाल्यास मला आनंद वाटेल. छोट्या बालकाचे देशाचा उत्कृष्ट नागरिक म्हणून परिवर्तन करण्याचे कार्य शिक्षकाला कारायचे असते. राष्ट्रउभारणीच्या कार्यात शिक्षकाचा मोठा वाटा असतो. डॉ. राधाकृष्णन यांनी एके  ठिकाणी म्हटले आहे की, ज्या देशात निस्वार्थी निरपेक्ष व सेवावृत्तीने कोणतेही कार्य होते तेंव्हा त्या देशातील शिक्षकच खरे सन्मानाला पात्र होतात आणि म्हणूनच त्यांच्या जन्मदिनी शिक्षकांचा सन्मान केला जातो.