दिल्लीतील जामा मशिदीबाहेर झालेला गोळीबार नक्की केला कोणी, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. आतापर्यंत हा गोळीबार इंडियन मुजाहिदीनचा दहशतवादी कातिल सिद्दीकी आणि मोहम्मद अदिल ऊर्फ अजमल यांनी केल्याचे दिल्ली पोलीसांचे म्हणणे होते. यासंबंधी न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रामध्येही या दोघांची नावे आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वी इंडियन मुजाहिदीनचा म्होरक्या तेहसीन अख्तर आणि झिया उर रहेमान ऊर्फ वकास यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून या गोळीबारामागे सिद्धीकी आणि अजमल नसल्याचे सांगण्यात येते आहे.
तेहसीन याने तपासकर्त्यांना दिलेल्या माहितीतून हा गोळीबार वकास आणि असादुल्ला अख्तर यांनी घडवून आणला होता. कातिल सिद्दीकी आणि अजमल यांचा या गोळीबाराशी काहीही संबंध नाही, असे त्याने तपास अधिकाऱयांना सांगितल्याचे सूत्रांकडून समजते. इंडियन मुजाहिदीनचा सहसंस्थापक यासिन भटकळ याच्यासोबत असादुल्ला अख्तर याला नेपाळच्या सीमेवर गेल्यावर्षी अटक करण्यात आली होती. आता अख्तर याने वकासच्या सोबतीने जामा मशिदीबाहेर गोळीबार केल्याचे पुढे आल्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.
जामा मशिदीबाहेर १९ सप्टेंबर २०१० रोजी दुचाकीवरून आलेल्या दोन दहशतवाद्यांनी तैवानच्या विद्यार्थ्यांवर अंदाधुंद गोळीबार केला होता.