पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार बडय़ा भांडवलदारांसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावत असल्याचा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी येथे केला. तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना गरिबांचा विसर पडला असून ते मिनी मोदी आहेत, अशी टीकाही गांधी यांनी केली.
राहुल गांधी यांनी १५ कि.मी.च्या पदयात्रेला सुरुवात केली असून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यूपीए सरकारने २०१३ मध्ये मंजूर केलेला भूसंपादन कायदा सौम्य करण्याचा एनडीए सरकार प्रयत्न करीत असल्याचा आरोपही गांधी यांनी केला.
पंतप्रधान मोदी आणि मिनी मोदी यांनी भारत आणि तेलंगणमध्ये बदल घडविण्याचा निर्धार केला आहे, पण जे गरीब देशात बदल घडवितात त्यांचा या नेत्यांना विसर पडला आहे, असेही राहुल गांधी म्हणाले. मोदी अथवा मिनी मोदींनी शेतकऱ्यांची भेट घेतल्यास आपल्याला काळजी वाटणार नाही, असेही ते म्हणाले.
शेतकऱ्यांकडून जमीन घेतल्यानंतर पाच, दहा, १५ अथवा ५० वर्षांनंतरही तेथे काम सुरू झाले नाही तरीही ती जमीन शेतकऱ्यांना परत दिली जाणार नाही. विशेष आर्थिक क्षेत्रात पडलेली हजारो एकर जमीन सरकार वापरत नाही, शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्याचा प्रयत्न सुरू आहे, असेही ते म्हणाले.
ही जमीन सुपीक असल्यानेच ती घेतली जात आहे आणि ती धनदांडग्यांना द्यावयाची आहे, असेही ते म्हणाले.