भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) घटकपक्षांची संख्या कमी होत असतानाच आता लोक जनशक्ति पार्टीचे अध्यक्ष रामविलास पासवान यांचे चिरंजीव चिराग पासवान यांनीदेखील भाजपाला खडेबोल सुनावले आहेत. राम मंदिर हा एका पक्षाचा अजेंडा आहे, तो एनडीएचा अजेंडा नाही, अशा शब्दात त्यांनी भाजपाचे कान टोचले. भाजपाने राम मंदिराचे बांधकाम आणि हनुमानाची जात या मुद्द्यांवरुन जनतेमध्ये संभ्रम निर्माण करु नये, त्यांनी विकासाच्या मुद्द्यावरच भर द्यावा, असा सल्लाही त्यांनी भाजपाला दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोक जनशक्ति पार्टी ‘एनडीए’तील घटकपक्ष आहे. रामविलास पासवान हे लोक जनशक्ति पक्षाचे अध्यक्ष असून ते केंद्रीय मंत्री देखील आहेत. तर चिराग पासवान हे जमूई मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले आहेत. चिराग पासवान यांनी इंडियन एक्स्प्रेसला मुलाखत दिली आहे. या मुुलाखतीत ते म्हणतात, १० डिसेंबर रोजी एनडीएच्या बैठकीत आम्ही भूमिका स्पष्ट केली आहे. एनडीएने विकासाच्या मुद्दयावरच भर द्यावा. काही लोक राम मंदिर, हनुमानाची जात यासारखे मुद्दे मांडून लोकांमध्ये गैरसमज निर्माण करत आहे. राम मंदिर हा एक पक्षाचा अजेंडा असून तो एनडीएचा अजेंडा नाही, असे त्यांनी सुनावले.

राम मंदिरासाठी अध्यादेश काढल्यास भूमिका काय असेल, असा प्रश्नही चिराग पासवान यांना विचारण्यात आला. ते म्हणाले, राम मंदिरासाठी अध्यादेश काढण्यासंदर्भात भाजपाने मित्रपक्षांशी अद्याप चर्चा केलेली नाही. राम मंदिरासंदर्भात कोर्टाचा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल, सध्या तरी भाजपा अध्यादेश काढणार नाही असे दिसते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणांसाठी रोजगार आणि शेतकरी याकडे लक्ष दिले पाहिजे. २०१४ मध्येही मोदी देशातील तरुणांमुळेच सत्तेवर आले. यात शेतकऱ्यांनीही मोलाची साथ दिली, असे पासवान यांनी म्हटले आहे.

एखादे सरकार चार – पाच वर्षे सत्तेवर राहिले की लोकांमध्ये सरकारविरोधात थोडी नाराजी पसरणे साहजिक आहे. पण अजूनही तुम्ही परिस्थिती पाहिली तर एनडीए काँग्रेसपेक्षा आघाडीवर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अजूनही लोकप्रिय आहेत, असा दावा पासवान यांनी केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Temple is bjp agenda not for nda says ally ljp leader mp chirag paswan
First published on: 17-12-2018 at 10:05 IST