त्या भयानक दिसणाऱ्या माणसाने माझ्या चेहऱ्यावर सहा गोळ्या झाडल्या, असे १४ वर्षीय मोहम्मद वाली खानने पेशावरच्या सैनिकी शाळेवर दहशतवाद्यांनी केलेल्या भयानक हल्ल्याच्या आठवणी जागवताना सांगितले. नववी इयत्तेत शिकणारा मोहम्मद वर्षभरापूर्वी पेशावरमधील सैनिकी शाळेवर झालेल्या हल्ल्यातून बचावला होता. तेहरिक-ए-तालिबान या दहशतवादी संघटनेने केलेल्या या हल्ल्यात १५० जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये बहुतांशी शाळकरी विद्यार्थ्यांचाच समावेश होता. ‘अल-जझिरा’ या वृत्तवाहिनीवरील मुलाखतीत मोहम्मदने या हल्ल्याच्या भयानक आठवणींविषयी सांगितले.
त्या भयानक दिसणाऱ्या माणसाने ऑडिटोरिअममध्ये प्रवेश केला आणि अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरूवात केली. त्याने माझ्या चेहऱ्यावर सहा गोळ्या झाडल्या, हात आणि पायावरदेखील एक-एक गोळी झाडली. त्यावेळी मी माझ्या आईला पुन्हा कधीही मिठी मारू शकणार नाही, असे मला वाटले.
दहशतवादी जेव्हा आमच्या शाळेच्या ऑडिटोरिअममध्ये शिरले तेव्हा त्यांनी जो दिसेल त्याला गोळ्या मारायला सुरूवात केली. जेव्हा त्या दहशतवाद्यांची नजर माझ्याकडे वळली तेव्हा त्यांनी थंड नजरेने माझ्याकडे पाहिले आणि माझ्या चेहऱ्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्यांनी बाकांखाली लपलेल्या माझ्या मित्रांना बाहेर खेचून काढले आणि त्यांनाही गोळ्या मारल्या, असे मोहम्मदने मुलाखतीदरम्यान सांगितले.
मी त्यावेळी घाबरल्यामुळे किंचाळलो नाही. त्यावेळी मी फक्त एवढाच विचार करत होतो की, आता मी या जगात राहणार नाही, मी माझ्या आईबरोबर राहणार नाही. या हल्ल्यानंतर मी आठ दिवस बेशुद्धावस्थेत होतो, मी माझ्या पायावर परत उभा राहीन असे वाटत नव्हते. मात्र, अल्लाने मला मदत केली आणि मी जिवंत आहे. या हल्ल्यानंतर सुरूवातीला माझ्या मनात असा विचार आला होता की, मी पाकिस्तानी लष्करात दाखल होऊन माझ्या मित्रांच्या हत्येचा बदला घेईन. मात्र, त्यानंतर मी ठरवले की, शिक्षणाच्या माध्यमातून लढा देऊन मी त्यांना हरवेन, असे मोहम्मदने सांगितले.