थायलंडमधील चियांग राय प्रांतातील थांम लुआंग नांग नोन गुहेत थायलंडची ज्युनिअर फुटबॉल टीम बेपत्ता झाली असून त्यांचा शोध घेतला जात आहे. गेल्या चार दिवसांपासून किशोरवयीन फुटबॉल खेळाडू आपल्या प्रशिक्षकासोबत गुहेत अडकले असून युद्धपातळीवर त्यांचा शोध घेतला जात आहे. पाऊस आणि चिखलामुळे शोधमोहिमेत खूप अडचणी येत आहेत. खेळाडू आणि कोच शनिवारपासून या गुहेत अडकले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गुहेच्या प्रवेशद्वारावर खेळाडूंच्या सायकल, शूज आणि काही इतर वस्तू सापडल्या आहेत.

बचावकार्यात सहभागी टीमचे प्रवक्ता पेतिसेन यांनी बेपत्ता झालेले सगळेजण अद्यापही जिवंत असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. मात्र ७२ तासांच्या शोधानंतरही एकाचाही पत्ता लागलेला नाही. थायलंड लष्कराची उच्चस्तरीय टीम सर्वोत्तम उपकरणांच्या सहाय्याने खेळाडू आणि प्रशिक्षकाचा शोध घेत आहे. बेपत्ता झालेल्या फुटबॉल टीममधील १२ खेळाडूंचं वय ११ ते १६ वर्ष आहे. हे सर्वजण आपल्या प्रशिक्षकासोबत गुहेत आले होते.

पेतिसेन यांच्या म्हणण्यानुसार, पावसामुळे गुहेत जाणार रस्ता बंद झाला असून, पावसामुळे ते बाहेर येऊ शकले नाहीत. एका अरुंद मार्गाच्या सहाय्याने हे सर्वजण गुहेत शिरले होते. मात्र वाढत्या पाण्यामुळे बाहेर येणारा रस्ता बंद झाला, ज्यामुळे सगळे आतमध्ये अडकले आहेत.

थायलंड नॅशनल पार्कच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘आम्ही गेल्या २४ तासांपासून अथक प्रयत्न करत असून खूप अडचणी येत आहेत. अंधार आणि काही ठिकाणी ऑक्सिजनची असलेली कमतरता आणि पाऊस यामुळे आमचं काम अजून कठीण होत आहे’. पार्कातील एका अधिकाऱ्याने खेळाडूंना गुहेच्या प्रवेशद्दारावर पाहिलं होतं. उत्तर आयर्लंडमध्ये गुहा प्रसिद्ध असून त्यांना पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येत असतात.