अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणी त्याच्या वडिलांनी दाखल केलेल्या प्राथमिक माहिती अहवालाचा पाटण्यातील कुठल्याही गुन्ह्य़ाशी किंवा घटनेशी संबंध नाही, असा युक्तिवाद सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात केला आहे.

न्या. हृषीकेश रॉय यांच्या नेतृत्वाखालील पीठास रियाचे वकील श्याम दिवाण यांनी सांगितले, की यात राज्याने मोठा हस्तक्षेप केला असून चौकशीत प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे पक्षपातीपणाचा धोका निर्माण झाला आहे. या सगळ्या प्रकरणातील घटनाक्रमांची आठवण देऊन त्यांनी सांगितले, की सुशांतच्या वडिलांनी त्याचा मृत्यू झाल्यानंतर २८ दिवसांनी म्हणजे खूप विलंबाने प्राथमिक माहिती अहवाल दाखल केला आहे. त्या प्राथमिक अहवालात जो तपशील दिला आहे तो मुंबईतील घटनांशी संबंधित आहे.

सुशांतच्या बहिणीची ‘ईडी’कडून चौकशी

मुंबई : सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) सुशांतसिंह राजपूतच्या बहिणीची  मितू सिंहची मंगळवारी चौकशी केली.  ईडीने मंगळवारी सुशांतची व्यवस्थापक श्रुती मोदी आणि सिद्धार्थ पिठानी यांनाही चौकशीसाठी बोलावले होते. सिद्धार्थ, श्रुती सकाळी अकराच्या सुमारास ईडी कार्यालयात हजर झाले. तर मीतू सिंह दुपारी ईडी कार्यालयात आल्या.