News Flash

“उत्सव, टाळी-थाळी खूप झालं आता देशाला लस द्या ; इव्हेंटबाजी कमी करा…”

राहुल गांधींनी साधला पंतप्रधान मोदींवर निशाणा

संग्रहीत

देशात करोनाचा संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने वाढताना दिसत आहे. दररोज मोठ्यासंख्येन करोनाबाधितांची नोंद होत असून, रूग्णांचे मृत्यू देखील वाढतच आहे. या पार्श्वभूमीर देशभरात सुरू असलेली लसीकरण मोहिम अधिक गतीमान करण्याच्या सूचना केंद्र सरकारकडून देण्यात आलेल्या आहेत. शिवाय, पंतप्रधान मोदींनी देशभरात ११ ते १४ एप्रिल दरम्यान  ‘लस महोत्सव’ आयोजित करण्याचे  सर्व राज्यांना आवाहन केले आहे. या अगोदर मागील वर्षी देखील मोदींनी लोकांना करोना विरोधातील लढाईला बळकटी मिळावी यासाठी टाळ्या-थाळ्या वाजवण्याचे तसेच दिवे लावण्याचे आवाहन केले होते. मात्र अद्यापही देशातील करोना संसर्ग संपलेला नाही. आता तर लसीकरण मोहिमेत देखील लसींच्या तुटवड्यामुळे अडथळा निर्माण होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.

“३८५ दिवसातही करोनाशी लढाई जिंकता आली नाही – उत्सव, टाळी-थाळी खूप झालं आता देशाला लस द्या..” असं राहुल गांधींनी ट्विट केलं आहे.

तसेच, “पंतप्रधान मोदी तुम्ही म्हणाला होता की करोना विरोधातील लढाई १८ दिवसांत जिंकली जाईल. तुम्ही टाळ्या- थाळ्या वाजवून घेतल्या, मोबाइलचा लाईट देखील लावायला लावला मात्र करोना वाढतच गेला. आता दुसरी लाट आहे आणि लाखो लोकं करोनाचे बळी ठरले आहेत. तुम्ही इव्हेंटबाजी कमी करा, ज्या कुणाला लसीची आवश्यकता आहे त्याला ती मिळवून द्या. लसीची निर्यात बंद करा आणि जे आपले गरीब बांधव आहेत. त्याना उत्पन्नासाठी पूर्णपणे सहकार्य करा.” असं देखील राहुल गांधी यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओत म्हटलं आहे.

“अहंकारी सरकारला चांगल्या सूचनांची अ‍ॅलर्जी!”; राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

या अगोदर देखील देशातील करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधलेला आहे. “केंद्र सरकारच्या अपयशी धोरणांमुळे देशात करोनाची भयानक दुसरी लाट आहे आणि स्थलांतरित मजूर पुन्हा एकदा गावाकडे परतण्यासाठी मजबूर झाले आहेत. सर्वसमान्यांचं जीवन व देशाची अर्थव्यवस्था दोन्हींसाठी लसीकरण वाढवण्यासोबतच त्यांच्या हातात पैसा देणं देखील आवश्यक आहे. मात्र अहंकारी सरकारला चांगल्या सूचनांची अ‍ॅलर्जी  आहे.” असं राहुल गांधी म्हणाले आहेत.

लसींची निर्यात थांबवा; राहुल गांधींचं मोदींना पत्र

“वाढत्या करोना संकटात लसींची कमतरता एक अतिगंभीर समस्या आहे, ‘उत्सव’ नाही. आपल्या देशवासियांना संकटात टाकून लसींची निर्यात योग्य आहे का? केंद्र सरकारने पक्षपातीपणा न करता सर्व राज्यांना मदत करावी. आपल्या सर्वांना मिळून या महामारीला हरवायचं आहे.” असं राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना पाठवलेल्या पत्रात म्हटलेलं आहे.

११ ते १४ एप्रिल दरम्यान लसमहोत्सव!

तर, करोना संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असताना अनेक राज्यांमध्ये प्रशासन शिथिल झाल्याचे दिसत आहे असे सांगतानाच; करोनाचा फैलाव ‘युद्धपातळीवर’ रोखण्यासाठी पुढील दोन-तीन आठवडे ठामपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केलं होतं. जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यासाठी ११ ते १४ एप्रिल दरम्यान ‘लस महोत्सव’ आयोजित करण्याचे आवाहनही त्यांनी केलेलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2021 4:14 pm

Web Title: the battle with corona could not be won in 385 days rahul gandhi msr 87
Next Stories
1 मोठी बातमी! भारतात रशियाच्या स्पुटनिक लसीच्या वापरासाठी परवानगी
2 बेड आहेत, तर मग लोक रांगेत का उभे आहेत?; गुजरात सरकारला उच्च न्यायालयाने फटकारलं
3 “महाराष्ट्रातील सर्व मंत्री एकेक करून राजीनामा देतील”, रामदास आठवलेंचा राज्य सरकारवर निशाणा!
Just Now!
X