पत्रकारितेतील सर्वोच्च पुलित्झर पुरस्कार मिळालेल्या छायाचित्रकार दानिश सिद्दीकी यांचा अफगाणिस्तानात तालिबानी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यांचं पार्थिव दिल्लीतल्या जामिया मिलिया विद्यापीठातील कब्रस्तानात रविवारी दफन करण्यात आलं. दहशतवादी आणि सैन्यातील संघर्षाचं कव्हरेज करताना दहशतवाद्यांच्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला होता. हे कब्रस्तान जामियातील कर्मचाऱ्यांसाठी राखीव आहे. दानिश सिद्दीकी विद्यापीठाचा माजी विद्यार्थी, तसेच कुटुंबाचं विद्यापीठाशी नातं असल्याने परवानगी देण्यात आली.

“सिद्दीकी यांच्या कुटुंबियांनी विनंती केल्यानंतर जामिया कब्रस्तानात दानिश यांचं पार्थिव दफन करण्याची परवानगी देण्यात आली. हे कब्रस्तान विद्यापीठातील कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी राखीव आहे.” असं पीआरओ अहमद अझीम यांनी सांगितलं. सिद्दीकी यांच्या कुटुंबियांचं विद्यापीठाशी जवळचं नातं आहे. दानिश यांचे वडील मोहम्मद अख्तर सिद्दीकी प्राध्यापक होते आणि जामिया नगरमध्ये राहत होते. दानिश यांनी जामियातून शालेय शिक्षण पूर्ण केलं. तसेच विद्यापीठातून अर्थशास्त्राची पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी पत्रकारीतेची पदवी घेतली. जामियाच्या कुलगुरु नझमा अख्तर यांनी शनिवारी दानिशच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं होतं.

नक्की काय घडलं?

‘रॉयटर्स इंडिया’चे मुख्य छायाचित्रकार असलेले सिद्दिकी ४० वर्षांचे होते. काही दिवसांपासून कंदहारमध्ये तालिबानी बंडखोर आणि अफगाण सैन्यात सुरू असलेल्या धुमश्चक्रीचे छायाचित्रण ते करीत होते, असे अफगाणिस्तानातील ‘टोलो न्यूज’च्या वृत्तात म्हटले आहे. अफगाणिस्तानची खास सुरक्षा पथके कंदहार प्रांतामधील स्पीन बोल्डाक हा मुख्य बाजारपेठेचा भाग तालिबान्यांच्या ताब्यातून परत मिळवण्यासाठी लढत आहेत. शुक्रवारी पहाटे तेथे तालिबानी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये हल्ले-प्रतिहल्ले झाले. तालिबान्यांनी केलेल्या हल्ल्यात सिद्दिकी यांच्यासह एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याचा मृत्यू झाला

अफगाणिस्तानमधील भारतातील राजदूतांनी काय सांगितलं?

अफगाणिस्तानचे भारतातील राजदूत फरीद मामुंदझे यांनी सिद्दिकी यांच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केले. अफगाण सुरक्षा दलांबरोबर असताना सिद्दिकी यांच्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला, असे त्यांनी ट्विटर संदेशात म्हटले आहे. अमेरिकेने अफगाणिस्तानातील सैन्यमाघारीला सुरुवात केल्यानंतर तालिबानी बंडखोरांनी डोके वर काढले. सुरक्षा दले आणि तालिबान्यांमध्ये कंदहारनजीकच्या भागात तुंबळ धुमश्चाक्री सुरू आहे. अफगाणिस्तानचा ८५ टक्के भाग काबीज केल्याचा दावा तालिबानने अलीकडेच केला आहे.

‘पुलित्झर’ने सन्मानित

जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्रात पदवी घेतली होती. त्यांनी दूरचित्रवाणी पत्रकार म्हणून सुरुवात केली आणि नंतर ते छायाचित्र पत्रकारितेकडे वळले होते. २०१० मध्ये ते रॉयटर्समध्ये दाखल झाले होते. सिद्दिकी व त्यांचे सहकारी अदनान अबिदी यांना २०१८ मध्ये रोहिंग्या निर्वासितांच्या पेचप्रसंगाच्या छायाचित्रणासाठी पुलित्झर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. सिद्दिकी यांनी २०२० मधील दिल्ली दंगल, करोना विषाणू साथ, नेपाळमधील २०१५ चा भूकंप, मोसुलमधील २०१६-२०१७ चा संघर्ष, हाँगकाँगमधील दंगली यांचे छायाचित्रांकन केले होते. त्यांची छायाचित्रे वाखाणली गेली होती.