मागच्या आठवडयात भारतीय नौदलाचे मिग-२९ के फायटर विमान अरबी समुद्रात दुर्घटनाग्रस्त झाले होते. अरबी समुद्रावरुन उड्डाण करत असताना हे विमान कोसळले होते. या विमानात दोन वैमानिक होते. त्यातील एका वैमानिकाला रेस्क्यू टीमने वाचवलं. पण दुसऱ्या वैमानिकाचा शोध लागला नव्हता.
दुर्घटनेनंतर ११ दिवसांनी मिग-२९ के मधील दुसरे वैमानिक निशांत सिंह यांचा मृतदेह अरबी समुद्रात सापडला आहे. भारतीय नौदलाचं मिग-२९के प्रशिक्षक विमान २६ नोव्हेंबरला पाच वाजता दुर्घटनाग्रस्त झालं होतं. गोव्याच्या किनाऱ्यापासून ३० मैल अंतरावर मृतदेह सापडला. भारतीय नौदलाकडून सातत्याने आपल्या बेपत्ता वैमानिकाचा शोध सुरु होता.
Indian Navy has recovered the body of the missing MiG-29K pilot Commander Nishant Singh on the seabed 70 metres below water. It has been found 30 miles off Goa coast after extensive search. The aircraft had crashed on Nov 26 while operating over Arabian Sea: Indian Navy officials
— ANI (@ANI) December 7, 2020
मिग-२९ विमानं याआधीही अनेकदा दुर्घटनाग्रस्त झाली आहेत. ८ मे २०२० रोजी पंजाबमधील नवाशहर येथे नौदलाचं लढाऊ विमान मिग-२९ तांत्रिक बिघाड झाल्याने दुर्घटनाग्रस्त झालं होतं. यावेळी वैमानिकाने पॅराशूटच्या सहाय्याने विमानातून उडी मारुन आपला जीव वाचवला होता. विमान एका शेतात दुर्घटनाग्रस्त झालं होतं, ज्यामुळे शेताला आग लागली होती.
तर २३ फेब्रुवारी २०२० रोजी गोव्यात मिग-२९ दुर्घटनाग्रस्त झालं होतं. वैमानिक या दुर्घटनेतून सुखरुपपणे बाहेर पडला होता. सकाळी १० वाजता विमानाने प्रशिक्षणासाठी उड्डाण केलं होतं. मात्र काही वेळातच विमानात तांत्रिक बिघाड झाला ज्याची माहिती एअर ट्राफिक कंट्रोलला देण्यात आली. याचदरम्यान विमान दुर्घटनाग्रस्त झालं.