दिल्ली विकास प्राधिकरणाकडून (डीडीए) संत रविदास मंदिर पाडल्याप्रकरणी बुधवारी रामलीला मैदानावर मोठ्या प्रमाणावर दलित समाज गोळा झाला होता आणि आंदोलन सुरु होते. यावेळी आंदोलकांमध्ये आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाल्याने भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्यासह अनेक जणांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्या अटकेवर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “दलितांच्या भावनांचा आदर होत नाही, त्यांचा होत असलेला अपमान आता सहनशीलतेच्या पलिकडे गेला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.”

प्रियंका गांधींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, “भाजपा सरकार पहिल्यांदा दलित बांधवांच्या सांस्कृतीक वारशाचे प्रतिक असलेल्या संत रविदास मंदिराशी छेडछाड करते त्यानंतर याविरोधात आवाज उठवण्यासाठी हजारोंच्या संख्येने समाज रस्त्यावर उतरतो तेव्हा त्यांच्यावर लाठीमार करते, अश्रूधुरांचा मारा करते, त्यांना अटक करते, अशा प्रकारे दलितांचा आवाज दाबून त्यांचा अपमान करणे आता सहनशीलतेच्या पलिकडे गेले आहे.

अनधिकृत असल्याचे सांगत दिल्ली विकास प्राधिकरणाकडून (डीडीए) संत रविदास मंदिर पाडल्याच्याविरोधात रामलीला मैदानात जमा झालेले लोक बुधवारी संध्याकाळी तुगलकाबाद येथे पोहोचले. त्यानंतर हजारो लोकांनी मंदिराच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला तर लोकांनी त्यांच्या दगडफेक सुरु केली. जमाव संतप्त होत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी बळाचा वापर केला. त्यानंतरही जमावाची पोलिसांसोबत मोठी बाचाबाची झाली. यावेळी रस्त्यावरच्या अनेक गाड्याही फोडण्यात आल्या. दरम्यान, पोलिसांनी बुधवारी रात्री उशीरा भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्यासमवेत डझनभर लोकांना ताब्यात घेतले.