कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी सरकारला कसलाही धोका नसल्याचे म्हटले होते. मात्र, अद्यापही सरकारच्या डोक्यावर टांगती तलवार कायम असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. कारण, काँग्रेस आमदारांच्या बैठकीत चार असंतुष्ट आमदारांनी दांडी मारली. यामुळे भडकलेले माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमित शाह आणि केंद्रीय मंत्र्यांवर टीका केली आहे.


सिद्धरामय्या यांनी बोलावलेल्या काँग्रेस आमदारांच्या बैठकीत एकूण ७९ आमदारांपैकी ७६ आमदराच उपस्थित राहिले होते. या अनुपस्थित आमदारांना आपण नोटीसा पाठवून याबाबतचे स्पष्टीकरण मागवणार आहोत त्यानंतर हायकमांडशी बोलणार आहोत, असे सिद्धरामय्यांनी म्हटले आहे. बैठकीचा आदेश काढण्यापूर्वी सिद्धरामय्या यांनी आमदारांना इशारा दिला होता की, बैठकीला सर्वांची उपस्थिती आवश्यक आहे. यावेळी जे उपस्थित राहणार नाहीत त्यांच्यावर पक्षांतरबंदी कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.

दरम्यान, ४ आमदारांनी बंडखोर भुमिका घेतल्याने काँग्रेसने आपल्या उर्वरीत सर्व आमदारांना एका रिसॉर्टवर पाठवून दिले आहे. या बैठकीला काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे, सिद्धरामय्या, काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल राव आणि राज्यातील इतर नेते उपस्थित होते.

चौकीदाराकडे इतकी मोठी रक्कम आली कशी?

सिद्धरामय्या म्हणाले, कर्नाटकातील सरकार पाडायचा पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि केंद्रीय मंत्र्यांचा डाव आहे. त्यांनी आमच्या आमदारांना ५० ते ७० कोटी रुपयांची मोठी ऑफर दिली असून याचा माझ्याकडे पुरावा आहे. त्यामुळे चौकीदाराकडे इतकी मोठी रक्कम आली कशी? असा खोचक सवाल त्यांनी केला आहे.

काँग्रेसचे ४ आमदार बैठकीला हजर नसले तरी यामुळे कर्नाटकच्या सरकारवर परिणाम होणार नाही. मात्र, यामुळे सरकारमध्ये सर्वकाही ठीक नाही हे सिद्ध झाले आहे. कारण, भाजपाने काही आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा यापूर्वी केला होता. त्यामुळे याला आता पुष्टी मिळाली आहे.