अनिवासी भारतीय वैज्ञानिक चैतन्य गिरी यांचे मत
तामिळनाडूत वेल्लोर येथे उल्कापाषाणाच्या आघाताने एक व्यक्ती महाविद्यालयाच्या आवारात मरण पावली होती, त्यामुळे देशाने उल्कापाषाणापासून संरक्षणासाठी प्रणाली उभारली पाहिजे, असे मत भारतीय वंशाचे वैज्ञानिक चैतन्य गिरी यांनी सांगितले. असे असले तरी हा आघात उल्कापाषाणाचा नसावा असे अमेरिकेतील नासा या संस्थेने म्हटले आहे.
गिरी यांच्या मते उल्कापाषाणापासून संरक्षण करण्यासाठी राष्ट्रीय धोरण आखणे गरजेचे आहे, तरच उल्कापाषाणाच्या आघातापासून रक्षणासाठी पायाभूत सुविधा तयार करणे गरजेचे आहे. चैतन्य गिरी हे सध्या टोकियोतील अर्थ लाइफ सायन्स इन्स्टिटय़ूटमध्ये काम करीत आहेत. त्यांनी सांगितले, की अवकाशातून असलेले धोके दुर्लक्षित करता येणार नाहीत, कारण त्यात मोठी प्राणहानी व वित्तहानी होऊ शकते. २००५ मध्ये नासाने अशा धोक्यांपासून हानी होऊ नये यासाठी लघुग्रहांवर लक्ष ठेवण्यासाठी टेहळणी सुविधा निर्माण करण्याची गरज व्यक्त केली होती. युरोपीय समुदाय, जपान, रशिया यांनीही त्याच दिशेने विचार केला व ते लघुग्रह, धूमकेतू यांच्यावर लक्ष ठेवून आहेत. कॅनडाचा स्वत:चा पृथ्वीनिकटच्या पदार्थाचे निरीक्षण करण्याचा प्रकल्प आहे. भारत याबाबतीत खूप मागे आहे. अवकाशातून अनाहूतपणे होणाऱ्या आघातापासून संरक्षण करण्याची कुठलीही योजना आपल्याकडे नाही. १३ नोव्हेंबर २०१५ रोजी सात फूट रुंदीचे उपग्रहाचे अवशेष श्रीलंकेच्या दक्षिण किनाऱ्यावर कोसळले होते व ते अमेरिकेतील आकाश टेहळणी संस्थेने सांगितले होते. युरोपीय स्काय नेटवर्कने तो ढिगारा कुठल्या मार्गाने पृथ्वीवर पडेल याची माहितीही दिली होती. या देशांनी अवकाशातून कोसळणाऱ्या उल्कापाषाणांचा धोका टाळण्यासाठी प्रकल्प राबवले असले तरी भारत मात्र त्यात मागे आहे, एखादा उल्कापाषाण किंवा धूमकेतू कोसळणार असेल तर त्याचे स्थान आपण निश्चित सांगू शकत नाही. यापूर्वी राजस्थानात रामगड व महाराष्ट्रात लोणार येथे अनुक्रमे चार कि मी व दोन किमी आकाराची विवरे उल्कापाषाणांच्या आघातामुळे तयार झाली होती. मध्य प्रदेशात ढाला येथे ११ किमी रुंदीचे विवर तयार झाले होते. त्यामुळे अशा आघातातून अणुस्फोटापेक्षाही जास्त ऊर्जा तयार होत असते. परिणामी, जीवित व वित्तहानी होते. खूप मोठय़ा उल्कापाषाणांचे आघात हजारो वर्षांतून कधीतरी होतात व काही छोटे उल्कापाषाण वेळोवेळी आघात करीत असतात, त्यामुळे कमी हानी होते. गिरी यांनी सांगितले, की नासाने २०१४ मध्ये काही उल्कापाषाणांचा नकाशा जाहीर केला असून, त्यात उल्कापाषाणांचे धोके जाहीर केले असून, ते आघात हिंदी महासागरी प्रदेशात होऊ शकतात. फेब्रुवारी २०१३ मध्ये २० मीटर व्यासाचा उल्कापाषाण रशियात चेलनीबिन्स्क येथे कोसळला होता. त्यात नागासाकीवर टाकलेल्या अणुबॉम्बइतकी ऊर्जा बाहेर पडली. २०१५ मध्ये केरळात कोझीकोड, मलापूरम, पलक्कड व त्रिचूर येथे उल्कापाषणांचा आघात झाला होता. अर्नाकुलम जिल्हय़ात असे अनेक आघात झाले आहेत, त्यामुळे भारतातही उल्कापाषाणांचा धोका आहे. या धोक्यांपासून वाचण्यासाठी इस्रोच्या मदतीने प्रयत्न केले पाहिजेत व अवकाशातील अशा उल्कापाषाण, लघुग्रहांची टेहळणी केली पाहिजे, त्यासाठी यंत्रणा उभारता येईल, त्यामुळे एखादा स्फोट उल्कापाषाणाचा होता की नाही यावर मतभिन्नताही राहणार नाही, हा उल्कापाषाण नव्हता या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅस्ट्रोफिजिक्स या बंगळुरू येथील संस्थेचा दावा गिरी यांनी फेटाळला आहे. उल्कापाषाण होता की नाही हे ठरवण्याचा अधिकार भारतीय भूगर्भ सर्वेक्षण विभागाला आहे. वैज्ञानिक पोलिसांनी दिलेले नमुने तपासत असतात. सर्वेक्षण विभागाचे अधिकारी घटनास्थळी जाऊन उल्कापाषाण गोळा करून त्याचे संशोधन करतात, तसेच बंगळुरूच्या संस्थेने तपासलेले नमुने हे पोलिसांनी दिलेले होते, त्यामुळे त्यांचे निष्कर्ष बरोबर गृहीत धरता येणार नाहीत. जे नमुने होते त्यात इरिडियम हे पृथ्वीवर नसलेले मूलद्रव्य होते हे तपासले की नाही हे समजलेले नाही, त्यामुळे निष्कर्षांबाबत संशय आहे.
गिरी यांनी सांगितले, की इंटरनेटवर चेन्नई शहरावर उल्कापाषाणांचा मोठा ढिगारा दिसतो आहे. त्याची दिशा वेल्लोरकडेच आहे. ती चित्रफीत खरी असेल तर वेल्लोर येथे आता पडलेला उल्कापाषाणच होता असे म्हणायला हरकत नाही.