दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री व काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र संदीप दीक्षित यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी म्हटले आहे की, माझ्या आईचा मृत्यू झाला आहे. हे नैसर्गिक आहे की तिला मी गमावले आहे. आई गमावल्याचे दुःख विसरता येत नाही. जेव्हाही विकासाच्या आणि वाढत्या दिल्लीबाबत लोकं बोलतील तेव्हा शीलीजींचं नाव आठवेल.

तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आदींसह दिग्गज राजकीय नेत्यांनी शीला दीक्षित यांच्या निजामुद्दीन ईस्ट येथील निवासस्थानी जाऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. शिवाय दीक्षित कुटुंबीयांचं सांत्वनही करण्यात आलं.

दीक्षित यांच्या निधनामुळे दिल्लीत दोन दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. उद्या सकाळी ११ वाजता त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवले जाणार आहे. त्यानंतर १२ वाजता ते काँग्रेस कार्यालयात नेले जाईल. या ठिकाणी काँग्रेस नेत्यांसह अन्य लोक त्यांना श्रद्धांजली अर्पण करतील. यानंतर दुपारी २.३० वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.