अंतर्गत मतभेदांमुळे राजस्थानातील अशोक गेहलोत सरकार अडचणीत सापडले आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील वाद विकोपाला गेल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. काल सचिन पायलट यांनी आपल्याला ३० आमदारांचा पाठिंबा असून गेहलोत सरकार अल्पमतात असल्याचा दावा केला होता. दरम्यान काँग्रेसकडून सचिन पायलट यांच्याशी संपर्क साधण्याचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत.

“मी स्वत: सचिन पायलट यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यांना अनेक संदेश पाठवले. पण त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिलेला नाही. ते पक्षापेक्षा मोठे नाहीत. पक्ष त्यांचे म्हणणे ऐकायला तयार आहे. पण बेशिस्त खपवून घेणार नाही. ते पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहतील अशी मला अपेक्षा आहे” असे अविनाश पांडे म्हणाले. ते राजस्थान काँग्रेसचे प्रभारी आहेत.

“काँग्रेसचा कुठलाही आमदार किंवा घटक पक्षातील आमदारांना कुठल्याही तक्रारी असतील, तर ते थेट येऊन माझ्याशी बोलू शकतात. आम्ही त्यावर मार्ग काढू. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी माझ्यावर ही विशेष जबाबदारी सोपवली आहे” असे अविनाश पांडे यांनी सांगितले.

आज सकाळी १०.३० वाजता काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. त्यामध्ये काँग्रेसचे किती आमदार कोणासोबत आहेत, ते स्पष्ट होईल.