पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिलेली घोषणा माँ-माटी-मानुष हवेत विरल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. मिदनापूर या ठिकाणी झालेल्या भाषणात ते बोलत होते. माँ-माटी-मानुष या घोषणेचे काय झाले हे आपण पाहतोच आहे. तु्म्हाला विरोध करणाऱ्यांची हत्या करा असा गटच इथे निर्माण करण्यात आला आहे. या गटाच्या परवानगीशिवाय इथे पानही हलत नाही. इतकेच काय इथे सामान्य माणसाला पूजा करणेही कठीण होऊन बसले आहे अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात केली.

सत्तेत राहण्यासाठी या ठिकाणी एका विशिष्ट समूहाचा वापर ममता सरकारकडून केला जातो आहे. या समूहाच्या दहशतीत इथली जनता वावरते आहे. तसेच या राज्यात भ्रष्टाचारही मोठ्या प्रमाणावर बोकाळला आहे. ममता बॅनर्जी यांनी जी बॅनरबाजी केली त्यावरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खोचक शब्दात टीका केली आहे. माझ्या भाषणासाठी ममता बॅनर्जी या स्वतः हात जोडून उभ्या आहेत असेच वाटते आहे असे म्हणत त्यांनी टोला लगावला आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांचेही हाल सुरु आहेत. मात्र केंद्र सरकारने जी मदत केली त्याचमुळे माझ्या स्वागतासाठी ममता सरकारने एवढ्या मोठ्या प्रमाणावर झेंडे लावले असेही मोदींनी सुनावले आहे.

पश्चिम बंगालची अवस्था सध्या बिकट आहे. सामान्य माणूस दहशत पसरवणाऱ्या एका गटामुळे त्रस्त आहे. शेतकऱ्यांसाठी हे सरकार काहीही करू शकलेले नाही. गरीबांचा विकास करण्यासाठी ममता बॅनर्जींनी कोणतीही पावले उचललेली नाहीत. तरूणांना राज्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. माँ-माटी-मानुष या घोषणेमागचा खरा चेहेरा काम समोर आला आहे.

पंतप्रधानांनी ममता सरकारवर टीका करत राज्यात पूजा करणेही कठीण होऊन बसले होते. राज्यात लोकशाही रक्ताने बरबटली आहे असाही आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. सध्या फक्त एका विशिष्ट गटाला महत्त्व देऊन व्होट बँकेचे राजकारण केले जाते आहे. महाविद्यालयात प्रवेश हवा असेल तरीही लाच द्यावी लागते इतकी वाईट अवस्था या राज्यात आहे. डाव्यांची सत्ता असताना पश्चिम बंगालची जी अवस्था होती त्यापेक्षाही जास्त वाईट अवस्था सद्य स्थितीत आहे असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.