अयोध्या, शबरीमला आणि माहिती अधिकार कायद्यासंदर्भातील अनेक महत्वाच्या प्रकरणांवर सुनावणी करणारे सरन्यायाधीश रंजन गोगोई १७ नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत. तत्पूर्वी नवे सरन्यायाधीश होणारे न्या. एस. ए. बोबडे यांच्याकडे त्यांनी महत्वाच्या खटल्यांची यादी सोपवली आहे. सरन्यायाधीश गोगोई यांच्या निवृत्तीसाठी आता केवळ पाचच कामकाजाचे दिवस शिल्लक राहिले आहेत.

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी आपले उत्तराधिकारी न्या. बोबडे यांच्याकडे अशा महत्वाच्या खटल्यांची यादी सोपवली आहे ज्यांची तत्काळ सुनावणी होणार आहे. यामुळे हे स्पष्ट होत आहे की, अयोध्या सारख्या संवेदनशील प्रकरणावर लवकरच निर्णय येऊ शकतो. या प्रकरणाची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने १६ ऑक्टोबर रोजी आपला निर्णय राखून ठेवला होता.

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी म्हटले होते की, निर्णय लिहिण्यासाठी कमीत कमी एक महिन्याची गरज आहे. दरम्यान, ते १७ नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत. या पार्श्वभूमीवर कोणत्याही दिवशी अयोध्येसह महत्वाच्या खटल्यांवर निर्णय येऊ शकतो.

अयोध्या, शबरीमला, आरटीआय आणि राफेल डील याबाबतच्या महत्वाच्या खटल्यांवर सुप्रीम कोर्टाकडून निकाल येणार आहे. या खटल्यांवरील निकाल देशातील राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचे असणार आहेत.