07 July 2020

News Flash

पॅरिसवर दहशतवादी हल्ला

या हल्ल्यांनंतर युरोपीय देशांसह अन्य देशांतील सुरक्षा व्यवस्थेत कमालीची वाढ करण्यात आली आहे.

२८ जण ठार, ३०० जखमी आठ अतिरेकी ठार, काही फरारी? ‘आयसिस’ जबाबदारी स्वीकारली दिल्ली, मुंबईसह राज्यात सतर्कतेचा इशारा

पॅरिसमधील रेस्तराँ, नाटय़गृह आणि क्रीडांगणासह सात ठिकाणी ‘आयसिस’च्या अतिरेक्यांनी शुक्रवारी रात्री भीषण आत्मघातकी हल्ले चढवत केलेल्या गोळीबार आणि बॉम्बहल्ल्यांत १२८ जण मृत्युमुखी पडले असून सुमारे ३०० नागरिक जखमी झाले आहेत. हा हल्ला म्हणजे फ्रान्सविरुद्धचे युद्धच असून कोणतीही दयामाया न दाखवता चोख प्रत्युत्तर दिले जाईल, अशी घोषणा फ्रान्सने केली आहे. तर सिरियातील हल्ल्यांत सहभागी असलेल्या फ्रान्समध्ये यापुढेही रक्तपात सुरूच राहील, असा इशारा ‘आयसिस’ने दिला आहे. या हल्ल्यांनंतर युरोपीय देशांसह अन्य देशांतील सुरक्षा व्यवस्थेत कमालीची वाढ करण्यात आली आहे.
फ्रान्समध्ये तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर फ्रान्सच्या भूमीवर झालेला हा सर्वात भीषण हल्ला असून २००४ साली स्पेनमधील माद्रिद येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतरचा युरोपमधील सर्वात मोठा हल्ला आहे. जानेवारी महिन्यात पॅरिसमधील शार्ली एब्दो या व्यंगचित्र साप्ताहिकाच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याच्या आठवणी यामुळे जाग्या झाल्या.
पॅरिससाठी कालचा दिवस काळा शुक्रवार ठरला. रस्ते रक्ताने माखले. एके-४७ स्वयंचलित बंदुका, हातबाँब, कमरेवर बांधलेले स्फोटकांचे पट्टे अशा शस्त्रास्त्रांनिशी पूर्ण तयारीने आलेल्या दहशतवाद्यांनी पॅरिसमध्ये मृत्यूचे थैमान घातले. ल बाटाक्लॅन या नाटय़गृहात संगीत कार्यक्रम सुरू असताना काही हल्लेखोरांनी अचानक गोळाबार सुरू करून काही प्रेक्षकांना ओलीस ठेवले. काय होत आहे हे कळण्याच्या आत तेथे सुमारे ८० जणांचे प्राण गेले होते. तीन हल्लेखोरांनी आपल्या अंगावर बांधलेल्या स्फोटकांसह स्वत:ला उडवून दिले तर चौथा हल्लेखोर सुरक्षा दलांबरोबरील चकमकीत मारला गेला. याशिवाय अन्य सहा ठिकाणीही हल्ले झाले.
ल बेले इक्वीप, ल कॉरिलॉन, ल पेटीट कॅमबोजे, ल कॉरिलॉन आणि ल कॅसा नोस्ट्रा या उपाहारगृहामध्येही दहशतवाद्यांनी गोळीबार केला. आठ दहशतवादी मारले गेले आहेत. एका अतिरेक्याच्या मृतदेहाजवळ सीरियाचे पारपत्र (पासपोर्ट) सापडले आहे.

फ्रान्सही जबाबदार!
’पॅरिसमध्ये जे घडले त्यामागे
दहशतवादाला खतपाणी घालण्याचे फ्रान्सचे धोरणही कारणीभूत आहे, असे प्रतिपादन सिरियाचे अध्यक्ष बशर अल्-असाद यांनी शनिवारी केले.
’दमास्कस येथे फ्रेंच नेत्यांच्या शिष्टमंडळाशी बोलताना असाद म्हणाले की, फ्रान्सच्या चुकीच्या धोरणांमुळे दहशतवादाने हातपाय पसरले आहेत.
’लेबनॉनची राजधानी बैरूत येथे जो रक्तपात झाला आहे आणि सिरियात गेली पाच वर्षे जे सुरू आहे त्यापासून पॅरिसचा हल्ला वेगळा करता येणार नाही, असेही ते म्हणाले.

भीती पसरवणे हा दहशतवाद्यांचा
हेतू आहे. पण याप्रसंगी आम्ही दहशतवाद्यांना दाखवून देऊ की त्यांचा सामना अशा देशाशी आहे की जो आपले रक्षण करणे जाणतो, त्यासाठी सैनिकी कारवाई करणे जाणतो. पुन्हा एकदा आपण दहशतवादाचा नि:पात करू.
– फ्रान्सवाँ ओलांद, फ्रान्सचे अध्यक्ष

क्रौर्यानंतर माणुसकीचेही दर्शन . . .

पॅरिसमधील हल्ल्याने
अमानुषतेचे जसे दर्शन घडविले तसाच माणुसकीचाही प्रत्यय दिला. हल्ल्यानंतर मेट्रो सेवा बंद होताच पॅरिसमधील टॅक्सीचालकांनी मीटर बंद केले आणि मोफत सेवा सुरू केली.

‘ओपन डोअर’ या नावाने समाजमाध्यमांत हॅशटॅग झळकला आणि हल्ल्यात अडकलेल्या आणि पॅरिसमध्ये राहण्याची सोय नसलेल्यांना एका रात्रीचा आसरा लोकांनी आपल्या घरात देऊ केला. आपले पत्तेही लोकांनी या माध्यमातून जाहीर केले.

हल्ल्यात २०० नागरिक जखमी आहेत. त्यातील ८० जणांची प्रकृती चिंताजनक आहे तर ४० जणांवर तातडीच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर रक्ताची गरज पडेल, हे लक्षात घेऊन रक्तदानासाठी पॅरिसमधील तरुणांच्या रांगा रुग्णालयात लागल्या होत्या.

हल्लेखोर नेमके कोण आणि
किती होते, याबाबत मात्र फ्रान्स माध्यमांमध्ये अनिश्चितता आहे. सात अतिरेकी आत्मघातकी हल्ले चढवताना ठार झाले आणि आठवा अतिरेकी आमच्या कारवाईत ठार झाला, असे पोलिसांनी सांगितले. काही अतिरेकी फरारी झाल्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे.

निदर्शने, मोर्चाना मनाई
भीषण हल्ल्यातील मदतकार्यात यंत्रणा गुंतल्याने पॅरिसमध्ये निदर्शने आणि मोर्चावर बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी सहा दिवसांसाठी आहे. मोर्चे वा निदर्शकांना संरक्षण देणे या घडीला शक्य नसल्याने ही मनाई घालण्यात आल्याचे सांगण्यात आले.

भारतात अतिदक्षतेचा इशारा
भारतातही अतिदक्षेतचा इशारा देण्यात आला आहे. दिल्ली, मुंबईसह सर्व महत्त्वाच्या शहरांतील सुरक्षा वाढवण्याचा आदेश देण्यात आला आहे. विमानतळ, रेल्वे स्थानके, बस स्थानके, धार्मिक स्थळांवर सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2015 4:18 am

Web Title: the terrorist attacks on the paris
टॅग Terrorist
Next Stories
1 एच १ बी व्हिसा घोटाळा प्रकरणी दोघे भारतीय बंधू दोषी
2 एच १ बी व्हिसा पद्धत सहा महिने स्थगित करण्याची क्रूझ यांची मागणी
3 पंतप्रधानांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लंडनमधील घराचे लोकार्पण
Just Now!
X