केंद्राने सोमवारी कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर वाढवले. लस पहिल्या डोसनंतर ४ ते ६ आठवड्यांच्या अंतराऐवजी ६ते ८आठवड्यांच्या अंतराने दिली जाऊ शकते.

“नवीन वैज्ञानिक पुरावा लक्षात घेता, कोविशिल्ट या विशिष्ट कोवि़ड -१९ प्रतिबंधक लसीच्या दोन डोसमधले अंतराचे राष्ट्रीय लसीकरण तांत्रिक सल्लागार समूह (एनटीजीआय) आणि लसीकरण प्रशासनावरील राष्ट्रीय तज्ञ समुह (एनईजीव्हीएसी) यांनी २० व्या बैठकीत पुनरावलोकन केले असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले. तज्ज्ञ समितीच्या शिफारशीनुसार कोविशिल्डचा दुसरा डोस ६ ते ८ आठवड्यांच्या दरम्यान दिल्यास ही लस जास्त प्रभावीपणे संरक्षण देईल.

दरम्यान, केंद्रीय आरोग्य सचिव श्री. राजेश भूषण यांनीही राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून एनटीजीआय आणि एनईजीव्हीएसीच्या शिफारशी मान्य केल्याबद्दल माहिती दिली आहे.

लाभार्थ्यांना कोविशिल्डचा पहिला डोस दिल्यानंतर दुसरा डोस ६ ते ८ आठवड्यांच्या निर्धारित मुदतीनंतर दिला पाहिजे, असा सल्ला आरोग्य सचिवांनी आपल्या पत्रात दिला. तथापि, दोन डोस मधील अंतर सुधारित करण्याचा निर्णय केवळ कोविशिल्डला लागू आहे, कोवॅक्सिन लससाठी नाही.

नुकतेच, लॅन्सेटच्या जागतिक अभ्यासानुसार, ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी-अ‍ॅस्ट्रॅजेनेकाच्या कोविड – १९ प्रतिबंधक लसीची कार्यक्षमता पहिला डोस नंतर दुसरा डोस १२ आठवड्यांनी दिला गेला तर ८१.३ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.