पाऊस पडावा म्हणून संयुक्त अरब अमिराती (यूएई) पर्वत तयार करण्याच्या योजनेवर काम करत आहे. अरेबियन बिझनेस मासिकातील वृत्तानुसार यूएई एक असा मानव निर्मित पर्वत तयार करत आहे ज्यामुळे पाऊस पडण्याच्या शक्यतेत वाढ होऊ शकते. यूएई यासाठी अमेरिकेतील नॅशनल सेंटर फॉर एटमॉस्फिअरिक रिसर्च (एनसीएआर) केंद्राची मदत घेत आहे. ह्या पर्वताची उंची किती असावी, तसेच उतरण किती ठेवायला हवी ज्यायोगे हवामानावर त्याचा योग्य प्रभाव पडेल यावर आम्ही काम करत असल्याचे रोएलॉफ ब्रुइत्जेस यांनी ‘अरेबियन बिझनेस’ला सांगितले.
पाऊस न पडणे ही यूएईमधील मोठी समस्या आहे. येथे वर्षभरात मुश्किलीने काही दिवस पाऊस पडतो. उन्हाळ्यात येथील तापमान ४३ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचते. यूएई अगोदरपासूनच पाण्याच्या समस्येशी मुकाबला करते आहे. त्यात पावसाचे अत्यंत कमी प्रमाण गंभीर समस्या निर्माण करते.
या समस्येवर मात करण्यासाठी कृत्रिम ढगांच्या निर्मितीचा मार्गदेखील अवलंबविला जात आहेत. गतवर्षी यासाठी यूएईने तीन कोटी सत्तर लाख रुपयांपेक्षा आधिक खर्च केला होता. या प्रकल्पांतर्गत यूएईने आत्तापर्यंत संशोधनासाठी म्हणून २ कोटी ६५ लाख रुपये खर्च केले असून, एक पर्वताची उभारणी करणे सोपे काम नसल्याने हा प्रकल्प खूप महागात पडू शकतो, असे ‘एनसीएआर’ने सांगितले.