गोव्यात दोन दिवस मुक्काम
भारत हा आमच्यासाठी आशिया पॅसिफिक क्षेत्रातील मोठा भागीदार देश आहे व त्याची भूमिका दिवसेंदिवस महत्त्वाची ठरत आहे, असे अमेरिकेचे संरक्षणमंत्री अ‍ॅशटन कार्टर यांनी सांगितले. ते तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. भारत व अमेरिका यांच्यात संरक्षण क्षेत्रात भागीदारीचे नवीन प्रकल्प सुरू केले जातील त्याबाबत कार्टर या दौऱ्यात काही नवीन घोषणा करण्याची शक्यता आहे. दरम्यान, दक्षिण महासागरात चीनने चालवलेल्या कारवायांबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली असून, या भागात सर्व काही सुरळीत नाही असे सूचक विधान केले आहे. संरक्षणमंत्री अ‍ॅशटन कार्टर व त्यांचे समपदस्थ मनोहर र्पीकर यांची चांगली मैत्री असून, कार्टर भारतात आल्यानंतर पहिले दोन दिवस गोवा मुक्कामी असणार आहेत.
कार्टर यांनी सांगितले, की इंडो आशिया पॅसिफिक भागात भारत हा प्रभावी देश आहे. कार्टर हे त्यांच्या तीन दिवसांच्या दौऱ्यात गोवा व नवी दिल्लीला भेट देणार आहेत. भारताची भूमिका महत्त्वाची आहे व ती सकारात्मक असेल. भारताचे सध्याचे धोरण अ‍ॅक्ट ईस्ट आशिया असले तरी दोन मोठे लोकशाही देश असलेल्या अमेरिका व भारत यांच्यातील संरक्षण संबंध महत्त्वाचे आहेत. आग्नेय व पूर्व आशियात भारताचे स्थान मोठे असून, जपानशी चांगले संबंध आहेत, असे त्यांनी सांगितले. डीटीआयआय म्हणजे डिफेन्स टेक्नॉलॉजी अँड ट्रेड इनिशिएटिव्ह या योजनेला २०१२ मध्ये मंजुरी देण्यात आली होती. आता या योजनेचा समन्वय मेक इन इंडिया कार्यक्रमाशी राहील असे त्यांनी सूचित केले. संरक्षणमंत्री मनोहर र्पीकर यांनी गोव्यात येण्याचे निमंत्रण कार्टर यांना दिले आहे. तेथे ते पश्चिम नौदल तळाला भेट देतील. र्पीकर डिसेंबरमध्ये अमेरिकेत गेले होते तेव्हा कार्टर यांनी त्यांना अणुशक्तीवर चालणाऱ्या विमानवाहू युद्धनौकेवर नेले होते व दोन्ही नेते तेथे एक दिवस राहिले होते. अमेरिकेची यूएसएस ब्लू रीज ही युद्धनौका कार्टर यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने गोवा येथे येणार असल्याचे समजते. १० व ११ एप्रिलला कार्टर गोवा मुक्कामी राहणार असून, नंतर ते पंतप्रधान मोदी व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोव्हल यांची भेट घेतील.