जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी तिरंगा ध्वजाबद्दल केलेल्या विधनावरून, त्यांच्यावर सर्वबाजूंनी टीका होत आहे. एवढेच नाहीतर दोन दिवसांपूर्वीच पीडीपीच्या तीन नेत्यांनी देखील यावरून नाराजी व्यक्त करत, पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. आता या मुद्यावरून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी देखील मेहबुबा मुफ्ती यांच्यावर निशाणा साधला आहे. ”कोणताही व्यक्ती जो काश्मीरमध्ये तिरंगा फडकवू इच्छित आहे, त्याला रोखलं जात असेल तर मग मी तो राष्ट्रदोह मानतो.” असं त्यांनी म्हटले आहे.

शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, ”जर मेहबुबा मुफ्ती, फारुख अब्दुल्ला आणि अन्य लोकं चीनच्या मदतीने काश्मीरमध्ये कलम ३७० लागू करू इच्छित आहेत. तर, केंद्र सरकारला कडक पावलं उचलायला हवीत. कोणताही व्यक्ती जो काश्मीरमध्ये तिरंगा फडकवू इच्छित आहे, त्याला रोखलं जात असेल तर मग मी तो राष्ट्रदोह मानतो.”

तसेच, केंद्र सरकारने समान नागरी कायदा (Uniform Civil Code ) आणायला हवा का? या प्रश्नावर उत्तर देताना संजय राऊत यांनी सांगितलं की, ”आम्ही या अगोदर देखील म्हटले आहे की, देशात समान नागरी कायदा लागू केला पाहिजे. जर सरकार असं काही आणत असेल, तर आम्ही त्याबाबत निर्णय घेऊ.”

या अगोदर मेहबुबा मुफ्ती यांनी तिरंगा ध्वजाबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपाने जम्मू-काश्मीरमध्ये तिरंगा रॅली काढली होती. एवढच नाहीतर पीडपी कार्यालवर देखील भाजपा कार्यकर्त्यांकडून तिरंगा ध्वज फडकवण्यात आला होता. यामुळे तेथील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.

१४ महिने स्थानबद्धतेत राहिल्यानंतर बाहेर पडलेल्या पीडीपी अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये आपल्या हातातील जम्मू-काश्मीरचा झेंडा दाखवत, ‘जोपर्यंत हा झेंडा परत येत नाही तोपर्यंत आम्ही तिरंगा फडकवणार नाही असं म्हटलं होतं. ”जोपर्यंत आम्हाला आमचा झेंडा परत मिळत नाही, तोपर्यंत आम्ही कोणताच झेंडा फडकवणार नाही. आमचा झेंडाच तिरंग्याबरोबरच आमच्या संबंधांचा मुख्य दुवा होता.”, असं मुफ्ती म्हणाल्या होत्या.