पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लमीन (एआयएमआयएम) पक्षाचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टीका केली असल्याचे दिसत आहे. ओवेसी यांचे नाव न घेता ममता बॅनर्जी यांनी हैदराबादमधील एक पार्टी आहे, जी भाजपाकडून पैसे घेते, असा गंभीर आरोप केला आहे. त्या कूचबिहार येथे कार्यकर्त्यांना संबोधित करत होत्या.

”अल्पसंख्याकांमधील कट्टरता वाढू लागली आहे. जशी ती हिंदुंमध्येही वाढत आहे. एक राजकीय पक्ष आहे जो भाजपाकडून पैसे घेतो. तो पश्चिम बंगालचा नाहीतर हैदराबादचा आहे.” असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

तसेच, यावेळी त्यांनी देशातील अल्पसंख्याकांमध्ये अनेक कट्टरपंथी आहेत. या कट्टरपंथींचे ठिकाण हैदराबादमध्ये आहे. तुम्ही लोक या लोकांकडे लक्ष देऊ नका’ असं देखील त्यांनी म्हटले आहे.

पश्चिम बंगालमध्ये आगामी काळात विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या राजकीय धोरणात बदल केला असल्याचे यावरून दिसून येत आहे. तसेच, आगामी निवडणुकीत भाजपाशी मुकाबला करण्यासाठी तृणमूल काँग्रेस आपली दिशा बदलण्याच्या प्रयत्नात असल्याचेही दिसत आहे. ममता बॅनर्जी यांनी कूचबिहारमधील मदनमोहन मंदिरात जाऊन प्रार्थना देखील केल्याची माहिती मिळाली आहे.