चीनने कोविड साथीच्या आठ महिन्यांच्या काळात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर जैसे थे परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला आहे, पण आमची सैन्यदले देशाच्या रक्षणात कुठलीही कसूर करणार नाहीत, असे संरक्षण प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी सांगितले.

नौदलाच्या ‘हिमगिरी’ युद्धनौकेच्या जलावतरण प्रसंगी आयोजित कार्यक्रमात त्यांनी चीनच्या सीमेवरील कारवायांमुळे सीमेवर निर्माण झालेल्या तणावावर भाष्य केले आहे.

ते म्हणाले, की करोना महासाथीच्या काळात चीनने उत्तर सीमेवर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक ‘जैसे थे’ परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आपण जमीन, सागरी व हवाई अशा सर्वच क्षेत्रात सज्ज असले पाहिजे. भारतीय सैन्य दले देशाच्या सीमांचे रक्षण करण्यात कुठलीही कसूर करणार नाहीत. लडाखमधील सीमेवर चीनच्या कारवायांमुळे पेच निर्माण झाला आहे. तिबेट स्वायत्त क्षेत्रातही चीनच्या कारवाया सुरू आहेत. असे असले तरी कुठल्याही धोक्यास तोंड देण्यास आमची सैन्य दले सज्ज आहेत, याचा देशातील जनतेने विश्वास बाळगावा.