जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारत आणि आफ्रिका हे दोन्हीही आशा व संधींचे दोन चकाकते बिंदू असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी नवी दिल्लीमध्ये केले. भारत आणि आफ्रिकेतील ५४ देशांच्या शिखर संमेलनाचे उद्घाटन गुरुवारी झाले. त्यावेळी बीजभाषण करताना मोदी यांनी भारत आणि आफ्रिकेतील देशांचे संबंध आणि भवितव्य यावर सविस्तर विवेचन केले. आफ्रिकेतील ५४ देशांचे प्रमुख या शिखर संमेलनासाठी दिल्लीमध्ये आले आहेत.
ते म्हणाले, भारत आणि आफ्रिका या दोघांनाही जोडू शकेल, असा महत्त्वाचा दुवा म्हणजे दोन्ही ठिकाणची तरुणाई. दोन्हीकडे एकूण लोकसंख्येच्या दोन तृतीयांश लोकसंख्या ३५ वर्षे किंवा त्यापेक्षा खालील वयाची आहे. जर कोणत्याही देशाचे भविष्य त्या देशातील तरूणांकडे असते, असे म्हटले तर या शतकाला दिशा देण्याचे काम भारत आणि आफ्रिकेतील देश करू शकतात. हे शिखर संमेलन म्हणजे केवळ भारत आणि आफ्रिकेतील देशांच्या प्रमुखांची बैठक नाही. जगातील मोठ्या लोकसंख्येची स्वप्ने या निमित्ताने एकाच छताखाली आली आहेत. आफ्रिकेतील वेगवेगळ्या ५४ देशांच्या रंगांमुळे जगाची विविधता आणखी खुलली आहे.
आफ्रिकेतील ५४ देशांच्या प्रमुखांची तेथून आलेल्या शिष्टमंडळांशी मोदी स्वतंत्रपणे चर्चा करणार आहेत. भारत आणि या देशांमधील द्विपक्षीय संबंध आणखी दृढ करून व्यापाराच्या दिशेने पाऊल टाकून तिथे गुंतवणूक करण्याचेही सरकारने निश्चित केले आहे.