मध्य प्रदेशमधील राजकीय धुळवडींने आता जोर धरला आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शाह यांच्या भेट घेतल्यानंतर, काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ट्विटरवर त्यांनी राजीनामा पोस्ट केला आहे. काँग्रेससाठी हा प्रचंड मोठा धक्का मानला जातो आहे. या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

दिग्विजय सिंह म्हणाले, मध्य प्रदेशच्या जनतेने दिलेल्या जनादेशाला उलटवण्याचे हे षडयंत्र आहे.  मुख्यमंत्री कमलनाथ यांनी माफियांविरोधात कारवाई केल्यामुळे असे केले जात आहे. जमीन, बांधकाम व्यवसायासह प्रत्येक माफियाविरोधात मुख्यमंत्री कमलनाथ यांनी कठोरपणे कारवाई केली आहे, त्यामुळे हे (भाजपा) घाबरलेले आहेत.

आणखी वाचा- मोदी-शाह भेटीनंतर ज्योतिरादित्य सिंधियांनी सोडला काँग्रेसचा ‘हात’

तसेच, भाजपाने  १५ वर्षे ई-टेंडरिंगमध्ये घोटाळे केले, व्यापम घोटाळा केला, माध्यमांमध्ये घोटाळा केला. या सर्वांवरचा पडदा उघडला जात आहे. हनी ट्रपमध्ये देखील जे भाजपाचे लोक सहभागी आहेत, त्यावरून देखील पडदा हटवला जाईल. या सर्वांना घाबरूनच ते हे सरकार पाडू इच्छित आहेत. असा आरोपही दिग्विजय सिंह यांनी माध्यमांशी बोलताना भाजपावर केला.

आणखी वाचा- भाजपात ज्योतिरादित्य सिंधिया यांना काय मिळणार? हे आहेत पर्याय

ज्योतिरादित्य शिंदे हे तरुण नेतृत्व आहे. कायम डावललं गेल्याने शिंदे हे नाराज झाले होते. आता ते पुढे काय करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ज्योतिरादित्य शिंदे स्वतःचा पक्ष काढून भाजपाला पाठिंबा देतात की भाजपात थेट प्रवेश करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.