भारतीय पाहुणचाराने मी भारावून गेलो आहे. इथला भव्य दिव्य स्वागत समारंभ मी कधीही विसरणार नाही असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. इतकंच नाही ताजमहाल येथे दिलेली भेट अविस्मरणीय होती असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासोबतचे संबंध आणखी दृढ होतील असा विश्वास व्यक्त केला आहे.

आम्ही आमच्या भेटीदरम्यान सुरक्षा, 5G वायरलेस नेटवर्क, आधुनिक तंत्रज्ञान, दोन्ही देशांची प्रगती या विषयांवर चर्चा केली. तसंच ३ अब्ज डॉलर्सचे करार होणार असल्याचंही ट्रम्प यांनी स्पष्ट केलं. या करारावर सकारात्मक चर्चा झाली. तसंच या कराराअंतर्गत भारताला आधुनिक शस्त्रास्त्रे अमेरिका देणार आहे. तसंच अपाचे आणि एम.एच. 60 ही हेलिकॉप्टर्सही देण्याबाबत सहमती झाली आहे असंही ट्रम्प यांनी स्पष्ट केलं.

“भारताने दिलेल्या निमंत्रणानंतर मी इथे आलो. माझं या देशात झालेलं स्वागत मी विसरु शकणार नाही. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माझ्यामध्ये महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. दोन्ही देशांचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी या चर्चेचा निश्चित उपयोग होईल. सुरक्षा, एनर्जी, टेक्नॉलॉजी, व्यापार या विषयांवर आमची चर्चा झाली. महात्मा गांधी यांच्या स्मारकाला दिलेली भेटही कायम स्मरणात राहिल” असंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे.