जम्मू-काश्मीरमधील किश्तवाडा येथे हिज्बुल मुजाहिद्दीन या दशतवादी संघटनेच्या तीन दहशतवाद्यांना अटक करण्यात यश आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते चंद्रकांत शर्मा आणि त्यांचा अंगरक्षक यांच्या हत्येप्रकरणी  ही अटक करण्यात आलेली आहे. तर अटक करण्यात आलेल्या तिघांपैकी एक निसार अहमद शेख हा भाजपा नेते अनिल परिहार यांच्या हत्येच्या कटात सहभागी होता व घटनास्थळी देखील हजर होता.

जम्मू परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक मुकेश सिंह यांनी याबाबत सोमवारी सांगितले की, मागील एक वर्षात किश्तवाडात दहशवादी हल्ल्याच्या चार घटना घडल्या आहेत. मात्र, किश्तवाडा पोलीस, सीआरपीएफ, लश्कराचे जवान व एनआयएच्या जवानांच्या सातत्याच्या प्रयत्नांमुळे आम्ही या चारही दहशतवादी हल्ल्यांचा तपास काढण्यात यशस्वी ठरलो आहोत. आतापर्यंत आम्ही याप्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. अटकेतील एकजण अनिल परिहार यांच्या हत्येच्या कटात सहभागी होता.

१४ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमध्ये संघाचे नेते चंद्रकांत शर्मा यांची हत्या करण्यात आली होती. त्यांची हत्या करण्यासाठी बुरखा परिधान करून दहशतवादी रुग्णालयात शिरले होते. यानंतर त्यांनी ओपीडी विभागात येऊन चंद्रकांत शर्मा यांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार सुरू केला होता. ज्यात शर्मा गंभीर जखमी झाले होते तर त्यांचा अंगरक्षक जागीच ठार झाला होता. गोळीबारानंतर सुरक्षारक्षकाकडील शस्त्र घेऊन हे दहशतवादी पळून गेले होते. यानंतर चंद्रकांत शर्मा यांचाही मृत्यू झाला होता. हल्ल्यानंतर परिसरात सलग पाच दिवस संचारबंदी लागू होती. शिवाय हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी अभियान देखील सुरू करण्यात आले होते.