बांधकाम सुरू असलेल्या एका पुलाचा काही भाग कोसळल्याने सुरतमध्ये तीन कामगारांचा मृत्यू झाला. पार्ले पॉइंट भागात मंगळवारी घडलेल्या या दुर्घटनेत सहा कामगार जखमीही झाले आहेत. हा पूल तयार करण्यासाठी लावण्यात आलेले लाकडी खांब काढत असतानाच अचानक पुलाचा काही भाग खाली कोसळला. त्यामुळे ढिगाऱ्याखाली काही कामगार दबले गेले, अशी माहिती सुरत महापालिकेच्या आयुक्तांनी दिली.
हा पूल शहरातील पार्ले पॉइंट आणि अदाजन या दोन महत्त्वाच्या भागांना जोडणारा दुवा असून, हा पूल तयार झाल्यास शहरवासीयांना त्याचा मोठा फायदा होणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख रुपयांची तर कायमस्वरुपी अपंगत्त्व आलेल्यांना प्रत्येकी १ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.