उत्तर प्रदेशातील बागपत केतवाली भागातील काही अज्ञात तरुणांनी धावत्या रल्वेमध्ये तीन मुस्लिम धर्मगुरुंवर धारदार शस्त्राने वार करुन बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी पाच ते सहा अज्ञात तरुणांवर गुन्हा दाखल केला आहे.


बागपतचे पोलिस अधीक्षक जय प्रकाश सिंह यांनी सांगितले की, बुधवारी रात्री दिल्लीतून तीन मौलाना पॅसेंजरने आपल्या गावी बागपतला परतत होते. दरम्यान, काही तरुणांशी त्यांचा कुठल्या तरी कारणाहून वाद झाला. त्यानंतर हा वाद विकोपाला गेल्याने या तरुणांनी तिन्ही मौलानांवर धारदार शस्त्राने हल्ला करुन बेदम मारहाण केली. त्यानंतर बागपतमधील अम्हैडा स्टेशनवर संबंधित मौलानांनी या मारहाणीबद्दल गोंधळ घातला.

त्यानंतर पोलिसांनी या प्रकाराची दखल घेत मारहाण करणाऱ्या अज्ञात तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बागपतचे रहिवासी असणारे मौलाना गुलजार, इसरार आणि अब्बू हे दिल्लीहून पॅसेंजरने बागपतला परतत होते. त्यानंतर रेल्वेत त्यांची वादावादी झाल्याने रात्री सुमारे पावणे एक वाजता बागपत पोलिस स्थानकांत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात  आला.

हा प्रकार रेल्वे पोलिसांच्या हद्दीतील असल्याने त्यांच्याकडे हा गुन्हा वर्ग करण्यात आला आहे.