जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाला. यातील दोन दहशतवादी हे स्थानिक असून एकाची ओळख पटली नव्हती. या दहशतवाद्यांकडे मोठ्याप्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा होता. स्थानिक लोकांच्या विरोधाची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने श्रीनगरमधील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवले असून इंटरनेटचा वेग कमी करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत दहशतवाद्यांपैकी इसा फजली श्रीनगर आणि सय्यद ओवेस कोकेरंग येथील होते. त्यांच्याकडून एके-४७ रायफल, पिस्तुल, ग्रेनेडसह मोठ्याप्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला. या कारवाईत सुरक्षा दलांचे काहीही नुकसान झालेले नाही. अद्यापही शोध अभियान सुरू आहे.

जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक शेष पॉल वैद्य यांनी सांगितले की, दहशतवाद्यांपैकी एकाने नुकताच पोलीस पोस्टवर झालेल्या हल्ल्यात सहभागी झाला होता. यामध्ये एक कॉन्स्टेबल शहीद झाला होता. दहशतवाद्यांचा हा गट सुरक्षा दलांची हत्यारे पळवून नेण्यामध्ये सहभागी होता. दहशतवादी स्थानिक असल्यामुळे विरोधाची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने शाळा, महाविद्यालये बंद ठेवली आहेत.

जुन्या श्रीनगरमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून इंटरनेटचा वेगही कमी करण्यात आले आहे. यापूर्वी रविवारी दक्षिण काश्मीरमधील कुलगाम येथे दहशतवाद्यांनी एक हल्ला केला होता. कुलगाममधील नूराबाद परिसरात अज्ञात दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीर सरकारचे माजी मंत्री आणि नूराबाद विधानसभेचे आमदार अब्दूल मजीद यांच्या घरावर ग्रेनेड हल्ला केला होता. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.