चीन-अमेरिकेतील तणाव निवळण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत चालला आहे. काही दिवसांपूर्वी चीनचं दूतावास बंद करण्याचे आदेश देणाऱ्या अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला आणखी एक दणका दिला. भारतापाठोपाठ अमेरिकेनंही चिनी अॅपवर घालण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांनी या आदेशावर स्वाक्षरी केली असून, यात लोकप्रिय असलेल्या टिकटॉकसह अनेक अॅपचा समावेश आहे. या निर्णयावर चीननं संताप व्यक्त करत अमेरिकेला सुनावलं आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरूवारी संध्याकाळी चिनी अॅप टिकटॉक आणि वी-चॅटवर ४५ दिवसांच्या आत बंदी घालण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली. ट्रम्प यांनी आदेश काढल्यानंतर चीननं यावर संताप व्यक्त केला आहे. यासंदर्भात रॉयटर्सने वृत्त दिलं आहे. “चिनी अॅपवर बंदी घालण्याचा अमेरिकेचा निर्णय आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या तत्त्वांच्या विरोधात आहे. आमची अमेरिकेला विनंती आहे की, त्यांनी त्यांची चूक सुधारावी,” असं चीननं म्हटलं आहे.

आणखी वाचा- चीनला मोठा झटका; टिकटॉकवर बंदी घालणाऱ्या आदेशावर ट्रम्प यांची स्वाक्षरी

अमेरिकनं सिनेटनं कर्मचाऱ्यांच्या टिकटॉक वापरण्यावर बंदी घालणाऱ्या आदेशाला मान्यता दिली होती. “टिकटॉकसारख्या अविश्वासू अॅपद्वारे डेटा जमवला जाणं हे देशाच्या सुरक्षेविरोधात आहे. डेटा मिळवल्यामुळे चीनच्या कम्युनिस्ट पक्षाला अमेरिकेतील लोकांच्या खासगी आणि मालकीची माहिती मिळते. यामुळे चीन अमेरिकेतील फेडरल कर्मचारी आणि कंत्राटदारांच्या ठिकाणांचा मागोवा घेऊ शकते. इतकंच नाही तर कम्युनिस्ट पक्ष खासगी माहितीचा वापर करून धोका निर्माण करू शकतो आणि कॉर्पोरेट हेरगिरीदेखील करू शकतो,” असं ट्रम्प यांनी हा आदेश काढल्यानंतर सांगितलं होतं.

आणखी वाचा- Ban China Products: ३७१ दर्जाहीन चिनी वस्तूंवर बंदीचा बडगा

भारतात आधीच ५९ चिनी अॅपवर बंदी

भारतीय गुप्तचर यंत्रणांनी ५२ धोकादायक चिनी अ‍ॅप्ससंदर्भात केंद्र सरकारने या अ‍ॅप्सवर बंदी घालावी किंवा देशातील नागरिकांना ही ५२ चिनी अ‍ॅप्स वापरुन नये असा इशारा दिला होता. ५२ चिनी अ‍ॅप्स सुरक्षित नसून, या अ‍ॅप्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भारतीयांची माहिती दुसऱ्या देशांमध्ये पाठवली जात आहे, असा इशारा दिला होता. सुरक्षा यंत्रणांनी सरकारला पाठवलेल्या यादीमध्ये टिक-टॉकबरोबरच युसी ब्राऊझर, एक्झेण्डर, शेअरइट, क्लीन मास्टर यासारख्या अ‍ॅप्सचा समावेश होता. त्यानंतर केंद्र सरकारनं ५९ चिनी अॅपवर बंदी घातली होती.